
प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील क्षेत्रात येणारा सदाहरित वृक्ष म्हणजे गोरख चिंच होय. या झाडाखाली गोरक्षनाथांनी आपल्या शिष्यांना विद्या प्रदान केली म्हणून या वृक्षाला गोरख चिंच म्हटले जाते अशी अख्यायिका सांगितली जाते. अदानसोनिया डिजिटेटा असे याचे शास्त्रीय नाव सांगितले जाते. मायकेल ॲडनसन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले.

सुमारे ५० फुटांपर्यंत उंच आणि खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात.खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. फळाचे साल मखमली असून वजन साधारण १.५ किलो असते. गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात.

गरापासून शीत पेय करतात. गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो. जंगली प्राणी याची पाने आवडीने खातात. माणसे खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलके असते. त्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात. अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो. या वृक्षावर सुगरणीसारखे पक्षी घरटी करतात. याच्या फळाचा गर सरबत म्हणून वापरला जातो, जो शरीरातील दाह आणि तृष्णा कमी करतो. ताज्या बियांची भाजी करतात किंवा भाजून कॉफीऐवजी वापरतात. याच्या पानांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम आणि टार्टरेट असते. झाडाची साल आणि लाकूड: या दोन्हीचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. गोरख चिंच पित्त, हिंवताप आणि दमा यावर गुणकारी आहे, घरगुती लोणी किंवा ताकाबरोबर गोरखचिंचे गराचे चूर्ण दिल्यास अतिसार आणि प्रवाहिंकावर आराम मिळतो. गोरखचिंच चूर्ण आणि जिरे चूर्ण यांचे मिश्रण महिलांच्या श्वेतप्रदर समस्येवर मदत करते. गोरखचिंच गराचे चूर्ण आम्लपित्त या विकारात गुणकारी आहे. उन्हाळ्यात पित्तप्रधान ज्वरात तहान भागवण्यासाठी गोरखचिंचे गराचे चूर्ण आणि साखरपाणी देतात.

महाराष्ट्रात अहिल्यानगर (अहमदनगर ) जिल्ह्यातील धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करण्यासाठी येतात. गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबंगीनाथ यांनी या ठिकाणी तप केले अशी आख्यायिका सांगितली जाते.
अभय मिरजकर
९९२३००१८२४..

