
लातूर, हरंगुळ (खु.) येथील संवेधना सेरेब्रल पाल्सी विकान केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने ‘योग समावेश’ या विशेष सिग्नेचर कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे (आयुष मंत्रालय, भारत सरकार) आणि महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद प्रणव निसर्गोपचार व योग केंद्र, नंदनवन कॉलनी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. दीपा पाटील (प्राचार्या, संवेधना केंद्र) व डॉ. ज्योती कुंभार (वैद्यकीय अधिकारी, NIN पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजक डॉ. किरण सगरे पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद, लातूर), डॉ. सृष्टी पांचाक्षरी सगरे, डॉ. श्रीनिवास भांडे, श्री. भगवत कुंभार हेही उपस्थित होते.
या प्रसंगी ‘स्वास्थ्य किरण’ या विशेष योग दिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
उद्घाटनानंतर डॉ. सृष्टी पंचाक्षरी सगरे यांनी ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ सत्राचे नेतृत्व करत उपस्थितांना विविध योगासने आणि श्वसन तंत्र शिकवले. त्यांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर डॉ. श्रीनिवास भांडे यांनी सेरेब्रल पाल्सीवरील योग चिकित्सा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. किरण सगरे पाटील यांनी ‘योग फॉर हॅपिनेस: अ वे ऑफ लाईफ’ या विषयावर भाष्य करत योगाचे मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक फायदे उलगडून दाखवले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. बुरांडे यांनी आभारप्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट समन्वय प्राणव इन्स्टिट्यूट ऑफ नेचर अँड योगिक सायन्स, नंदनवन कॉलनी, कावा रोड, लातूर तसेच संवेधना केंद्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. डॉ. मयुरी जी., श्री. बुरांडे आणि सौ.सुप्रिया सगरे यांचे विशेष योगदान लाभले.
हा योग दिन विशेषतः विशेष मुलांसाठी योगाचा सकारात्मक परिणाम अधोरेखित करणारा ठरला असून सर्वांसाठी समग्र आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा अनुभव बनला.

