
अहमदपूर तालुक्यातील चिखली ग्राम पंचायतीचा अजब कारभार
पिडीत वयोवृद्ध शेतकऱ्याच्या न्यायासाठी शासन दरबारी फेऱ्या
लातूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे नरेगा विभागांतर्गत ग्राम पंचायत पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र उपलब्ध असलेला रस्ता सोडून माझ्या मुलाच्या नावे असलेल्या गट क्रमांक ५६४ मधून सदर रस्त्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप प्रल्हाद निवृत्ती कराड यांनी केला आहे.

यासंबंधीची रितसर तक्रार कराड यांनी ग्राम पंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार, उप जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने शेत रस्ते/पाणंद रस्ते महत्वाचे ठरले आहेत. मात्र ही कामे, दर्जेदार, पारदर्शक, तंटाविरहित करण्यात यावेत असे शासनाचे सक्त निर्देश असताना रस्ता सोडून शेतकऱ्याच्या शेतातून पाणंद रस्ता तयार होत असलेला हा अजब प्रकार चिखली येथे घडला आहे. सदर रस्त्याची हद्द कायम करून माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा अन्यथा मला कुटुंबियांसमवेत उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा कराड यांनी दिला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून यासाठी मी चिखली, अहमदपूर, लातूर येथील शासकीय कार्यालयात पाठपुरावा करीत आहे मात्र कुणीही प्रतिसाद देत नसल्याची खंत वयोवृद्ध शेतकरी प्रल्हाद कराड यांनी व्यक्त केली आहे.

