
लातूर | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाच्या परवानगीविना सुरू असलेल्या दोन अनधिकृत शाळांचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून, काल यापैकी एक अनधिकृत शाळा अधिकृतरित्या सील करण्यात आली आहे, तर दुसऱ्या शाळेवर आज कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईनंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत मनसे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की, “लातूर जिल्ह्यात कुठलीही शाळा विनापरवानगी सुरू ठेवू देणार नाही. अनधिकृत शाळांवर मनसे आक्रमक पवित्रा घेणार!”
आरटीई विद्यार्थ्यांची खुलेआम लूट!
विशेष म्हणजे, आर.टी.ई. (RTE) कायद्यान्वये शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन ॲपच्या नावाखाली शुल्क वसूल केल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला आहे. विद्यार्थ्यांना होमवर्कसाठी ॲप वापरण्यास भाग पाडले जात असून, हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी पालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
शाळा प्रशासनाचा हा प्रकार म्हणजे थेट शैक्षणिक लुटमार असून, याला शिक्षण विभागाने मूकसंमती दिल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.
मनसेने मागणी केली आहे की,
- शिक्षण विभागाने तत्काळ सर्व अनधिकृत शाळांची चौकशी करून कारवाई करावी.
- आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेतल्याची खातरजमा व्हावी.
- संबंधित शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
शिक्षणाच्या नावाखाली लूट थांबवा, अशी संतप्त मागणी करत मनसेने लातूरमधील सर्व पालकांना जागृत राहण्याचे आवाहन केले आहे.
#अनधिकृतशाळा #RTEलूट #मनसेचा इशारा

