प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, यूएमआयटी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई

आज आपल्या आजूबाजूला एक शब्द सारखा ऐकू येतो AI, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, काहीजण त्याला क्रांती म्हणतात, काहीजण भीती. पण खरं काय? आपल्या शिक्षण, कामकाज आणि दैनंदिन आयुष्यात तो खरंच मोठा बदल घडवतो आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, ‘AI मुळे आपली नोकरी जाईल का? काही नोकऱ्या खरंच बदलतील, काही बंदही होऊ शकतात. पण खरी गोष्ट अशी आहे की AI काही कामं घेऊन जाईल, पण नवीन प्रकारची कामं घेऊनही येईल. आपल्याला ती स्वीकारायला आणि तयार राहायला हवं. जर आपण योग्य पद्धतीने AI शिकून घेतलं, तर आपण त्याच्यासोबतच वाढू शकतो.
भारताची मोठी ताकद म्हणजे आपली युवा पिढी. आपल्याकडे ८० कोटीहून अधिक तरुण लोक आहेत. त्यापैकी अनेकजण आयटीमध्ये काम करत आहेत. अंदाजे ५८ लाख लोक माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रियापन (IT-BPM) क्षेत्रात कार्यरत आहेत, ही तरुणाईची उर्जा, आणि देशात उपलब्ध असलेल्या संधी, जर योग्य दिशेनं वापरल्या, तर भारत AI मध्ये अग्रेसर होऊ शकतो. पण आजही ७२.६% लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळालेलं नाही. हे अंतर आपण शिक्षणपद्धती आणि शिकण्याच्या सवयी बदलून भरून काढायला हवं.
काही लोक असं मत मांडतात की, AI आल्यानंतर कोडिंग शिकण्याची गरजच राहणार नाही. हे खरं नाही. कोर्डिंग शिकणं अजूनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला संगणक कसा विचार करतो हे समजतं. एक प्रोग्रामिंग भाषा उत्तम प्रकारे समजली, की इतर भाषाही सहज शिकता येतात. त्याचबरोबर, स्वच्छ विचार, इतरांबरोबर काम करण्याची तयारी, आणि स्पष्ट संवादकौशल्य हे गुणदेखील तितकेच आवश्यक आहेत, यालाच आपण soft skills म्हणतो.
AI च्या या नव्या युगात आपण काय केलं पाहिजे? अगदी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला ओळखणं, आपल्याला काय जमतं? काय शिकायला आवडतं? याचं प्रामाणिक उत्तर शोधा.
प्रत्यक्ष काम करत शिकायला सुरुवात करा. प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा, टीममध्ये काम करा. AI ची भीती बाळगू नका-त्याला आपला हुशार सहकारी समजा.
सतत शिकत रहा, नवीन गोष्टी समजून घ्या. यश मिळवायचं असेल, तर शिकणं कधीही थांबवू नका. AI विरोधात नाही, तर त्याच्यासोबत काम करा.
अहवाल सांगतात की, सुमारे २५ ते ३० टक्के काम AI मुळे आपोआप होऊ शकतं. पण त्यामुळे संधी बंद होत नाहीत त्या नव्या रूपात समोर येतात.
विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शाळा आणि कॉलेजांनीही बदलले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये लवकरच AI बद्दल शिकवायला हवं. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्राशी संबंधित कोडिंग शिकावं. AI चे साधनं प्रत्यक्ष वापरून पाहावीत. आणि वेगवेगळ्या विषयांमधून मिळालेल्या ज्ञानाने समस्या सोडवायला शिकावं. जुना अभ्यासक्रम पुरेसा नाही-उद्याची तयारी लागते.
AI मुळे अभियांत्रिकी संपणार नाही- ती नव्याने सुरू होईल. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण एक अशी पिढी घडवली पाहिजे जी AI समजून घेणारी, सजग, सर्जनशील आणि जगाच्या स्पर्धेसाठी तयार असेल,
माझ्या ३० वर्षाच्या अध्यापनातील अनुभवातून मला हे स्पष्ट वाटतं जो शिकणं सोडत नाही, त्याला कुठलीही यंत्रणा मागे टाकू शकत नाही.

