लातूर – सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकात्मता, अखंडता आणि सौहार्दपूर्ण वाटचालीसाठी मूल्यांची जोपासना व रुजवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. या विचारसरणीवर उभा असलेला समाज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या सक्षम ठरतो.
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करून सामान्य जनतेच्या मनात राष्ट्रवाद निर्माण केला. या वैचारिक परंपरेचा वारसा पुढे राजश्री शाहू, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे चालवला. या विचारां शिवाय स्वाभिमानी राष्ट्राची उभारणी अशक्य आहे.
आज देशात गौरवशाली इतिहासाची मोडतोड करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. एकांगी व चुकीचा इतिहास समाजावर लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशातील वैचारिक पोकळी भरून काढण्यासाठी, युवा पिढीमध्ये निकोप विचार निर्माण करण्यासाठी, तसेच योग्य संस्कार रुजवण्यासाठी लातूर जिल्ह्यात वैचारिक प्रबोधन हे कायमस्वरूपी कार्यान्वित राहणे अत्यंत आवश्यक आहे.
याच हेतूने “बिजांकुर विचार परिषद, लातूर” कार्यरत झाली आहे.
परिषदेच्या वतीने प्राच्यविधी पंडित आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ घटनातज्ज्ञ न्या. बी. जी. कोळसे पाटील, तसेच प्रबोधनकार, सप्तखंजीरवादक सत्यपाल महाराज यांच्या अलौकिक समाजकार्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दिनांक 11 जुलै 2025, शुक्रवार रोजी, सायंकाळी 4:00 वाजता, दयानंद सभागृह, लातूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. गोपाळराव पाटील असतील. कार्यक्रमाची सुरुवात सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमने होणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी अशी विनंती संयोजन समिती ,”बिजांकुर विचार परिषद, लातूर” यांच्यावतीने करण्यात येते.

