
अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारांचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन या सनातनी संघटनेच्या लोकांकडून शाईफेक व धक्काबुक्की करण्यात आली. या गंभीर घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांना मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विघातक प्रवृत्तींच्या मुसक्या अजूनही आवळल्या गेल्या नाहीत, हेच यातून पुन्हा दिसून येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंनिसने व्यक्त केली आहे. ‘कायद्याच्या राज्यात कोणत्याही मतभेदांवर असे हल्ले हे लोकशाहीची थट्टा आहेत,’ असे मतही अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा विधिमंडळात मंजूर झाला असून तीन दिवस उलटायच्या आतच गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आहे. ‘हा कायदा देखील आम्हाला रोखू शकत नाही,’ असा खुला इशाराच या हल्लेखोरांनी दिला आहे. या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हल्लेखोरांनी दिलेले हल्ल्याचे कारण अत्यंत फोल असून कोणत्याही कारणाने हुल्लडबाजी माफक न ठरवता गुन्हा म्हणूनच पाहिली जावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अंनिसची मागणी आहे.
“हे संत, विचारवंत, सुधारणावादी राज्याला भूषणावह नाही! कायदा सर्वांना समान आहे हे सिद्ध करून दाखवा,” असा स्पष्ट इशारा देत अंनिसने गुन्हेगारांना तात्काळ अटक करून हल्ल्यामागील सूत्रधारांचा छडा लावण्याची गरज व्यक्त केली आहे.
✒️ बातमी : महाराष्ट्र अंनिस, प्रतिनिधी
अधिक माहितीसाठी संपर्क : माधव बावगे, कार्याध्यक्ष – महाराष्ट्र अंनिस
