
पंचवीस वर्षांपूर्वी कंधार आणि कर्नाटकातील काही माणसं छत्रपती संभाजी नगर येथे आली होती. त्यांनी चल म्हटले आणि मी त्यांच्यासोबत करमाड परिसरात गेलो. तिथं एका मंदिरात सुरेल आवाजात भजनं गात असलेली एक महिला होती. मी तिथं बराच वेळ घुटमळलो. कुठलीही विचारपूस न करता घरी आलो. मात्र तो आवाज कानात घुमत होता. काळाच्या ओघात मी विसरूनही गेलो.
एक दशक उलटून गेले. तंत्रज्ञानाची क्रांती अफाट वेगानं समाजजीवनावर आदळत होती. त्यात अँड्रॉइड मोबाईल आले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या हातात संपूर्ण जग दिसू लागले. याच समाजमाध्यमातून एक सूर जगाच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागला, ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी.‘ हे कडवं प्रत्येकाच्या जिभेवर घोळू लागलं. तो स्वर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्या होत्या स्वरसम्राज्ञी गोड गळ्याच्या कडूबाई खरात. त्याच कडूबाईंचा संघर्ष अफाट कष्टाचा आहे.
कडूबाईंचा जन्म गावकुसाबाहेर आई तान्याबाई आणि वडील तुकाराम कांबळे यांच्या घरी झाला. आवाना ता. भोकरदन जि. जालना येथे तुकाराम कांबळे हे एकतारीवर सांप्रदायिक भजनं गात आपली उपजीविका करत. त्यांच्या म्हातारपणीचं एकमेव बाळ म्हणजे कडूबाईं. निसर्गानं सुरांचं अफलातून दान जिच्या ओटीत भरभरून टाकलं, तर तत्कालीन समाजाच्या रितीने एवढ्या गोड गळ्याच्या गायिकेचं नाव कडूबाई ठेवलं. बालपणीच गाण्याचा रियाज आई वडिलांसोबत कडूबाईंनी सुरू केला. निर्गुण निराकार भजन मंडळ त्यांचे होते. त्यात ते अभंग, गवळणी, पदं, गाणी गात. त्यातून मिळालेल्या मानधनावर ते जगत, पण त्यांचा संघर्ष सुरू होता. तुकाराम कांबळे यांचं तीन माणसांचं कुटुंब कलाकार असल्याने त्यांना जात व्यवस्थेचा जाच नव्हता. मात्र दुसरीकडे याच व्यवस्थेने दमकोंडी केल्यामुळे जगण्यासाठी साधनं उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना जगण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याच काळात कडूबाईंच्या गायनाचा पाया रचला गेला. आई वडिलांनी गायलेली, लाऊडस्पिकरच्या भोंग्यातून ऐकलेली गाणी त्या तोंडपाठ करू लागल्या. ती वेगवेगळी भजनं, गाणी, अभंग, गवळणी गाऊ लागल्या. कडूबाई यांचे लग्न वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना येथील देवीदास खरात यांच्यासोबत झाले. कडुबाई आईवडिलांना एकुलती एक असल्याने देवीदास खरात तुकाराम कांबळे यांचे घरजावई म्हणून आवाना येथे आले. त्यांचा संसार सुरू झाला. जे मिळेल ती कामे करू लागल्या. त्यातून त्यांचं जगणं सुरू होतं. मात्र त्यांच्या आत असलेली गायकी अस्वस्थ होती. अधूनमधून त्या वडिलांसोबत गायनाचे कार्यक्रम करत. यातच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मोठा आधार गेला. कडूबाई रोजंदारीवर काम करत करत संसाराचा गाडा हाकत होत्या. यातच देवीदास खरातही कायमच्या प्रवासाला निघून गेले. यावेळी कडुबाईंची मुलगी सहा महिन्यांची होती. घरी लहान लहान मुले, म्हातारी आई आणि स्वतः त्या. असा कुटुंबाचा भार कडूबाई यांच्यावर पडला; पण त्या डगमगल्या नाहीत. खंबीरपणे उभे राहिल्या. त्या सांगतात, ‘या काळात खूप परवड झाली. कार्यक्रम रात्री असत. त्यामुळे मुलांना घेऊन रात्री कार्यक्रम करणं जिकिरीचं होतं. म्हणून कार्यक्रम करणं बंद करून रोजंदारी सुरू केली. मात्र यात घरखर्च भागत नव्हता. यासाठी त्यांनी वडिलांची एकतारी उचलली. त्या एकतारीला घेऊन घरोघरी जाऊन गाणे गात होते. त्यातून घरखर्च भागत होता.’

कडुबाई ज्या कलापथकात गात होत्या त्याच पथकातील पेटी मास्तर तेजराव सपकाळ होते. त्यांनी चिकलठाणा येथे राहत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत मीराबाई उमप यांची ओळख करून दिली. मीराबाई यांनी त्यांना सोबत घेऊन काही कार्यक्रम केले. मीराबाई उमप यांच्यासोबत त्यांनी चार पाच वर्षे गायन केले. त्या चिकलठाणा परिसरात भाड्याने राहू लागल्या. मात्र प्रत्येक कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनावर घरखर्च भागत नव्हता. मग त्यांनी एकतारीला सोबत घेत वेगवेगळ्या नगरात गात फिरू लागल्या. लोक काही प्रमाणात मदत करू लागली. लहाणपणापासून ऐकलेली गाणी तोंडपाठ करत तेच गाणे नव्या सूरात त्या गाऊ लागल्या. तो गोड आवाज सहजपणे समाजात सुगंध पेरू लागला. एक दिवस ‘आपुन खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे कडुबाईंच्या सुरातलं गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं. तिथूनच कडुबाईची फाटकी झोळी दूर फेकली गेली आणि ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’ या गाण्याप्रमाणेच कडुबाईंची ओटी सोन्यानंच भरून गेली. इथूनच कडुबाईंचा गोड गळा सातासमुद्रापार गेला. त्यामुळे समाज माध्यमांसह टी. व्ही. चॅनल आणि प्रिंट मीडियावर त्या झळकल्या. मग कला, साहित्य आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्वांचं लक्ष वेधल्या गेलं. त्यांना भेटायला अनेक मान्यवर आली. कधीकाळी घरभाडे द्यायला पाचशे रुपये जवळ नव्हते त्यांना आता मदतीचा आधार मिळाला. जगण्याची परवड काही प्रमाणात थांबली. त्या नामवंत कलाकारांच्या स्टेजवर गाऊ लागल्या. एकाच व्यक्तीच्या जगण्यात दोन टोके कशी तयार झाली, याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कडुबाईंना झाला. आतापर्यंत मंदिरात भजनं, गवळणी गायल्या, पण त्यांना इतका मान सन्मान मिळाला नव्हता. जगायला समाधानकारक मिळत नव्हतं. मात्र जिभेवर ‘जयभीम’ येताच आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कडूबाई नम्रपणे म्हणतात, ‘मी बाबासाहेबांचं प्रबोधनाचं काम गाण्यातून केलं नसते तर जगू शकले नसते. बाबासाहेबांचे विचार अंगी नसते तर मी मेलो असते, माझी लेकरं मेली असती. बाबासाहेबांच्या विचारांनीच आम्हाला जगवले.’ हे समाजवास्तव आहे की, बाबासाहेबांच्या विचारावर जगणारा माणूस उपाशी मरत नाही. त्या माणसाच्या सुख – दु:खाला आधार होणारी अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.
कडुबाईंचा जीवन संघर्ष वेगवेगळ्या माध्यमातून समोर आला. त्यांना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांनी घर दिले. त्यामुळे कडूबाईंच्या जगण्यात स्थिरता आली. गावोगावी भीम गीतांचे कार्यक्रम होऊ लागली. आज जगात जिथे कुठे बाबासाहेबांचे अनुयायी राहत आहेत, अशा देशात कडूबाईंचा आवाज पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता अफाट आहे. कडूबाईंना असं वाटतं की, ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजातील जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे कार्य केले. मात्र आपण एकमेकांच्या जाती विचारत आहोत. मला लोकांनी जात विचारली की वाईट वाटते.’ एका निरक्षर भाबड्या लोककलावंताचं मन किती उदात्त हेतू घेऊन काम करत आहे, याची प्रचिती येते. यातून उच्च डिग्री घेऊन जातीच्या कोंडवाड्यात स्वतःला कोंडून घेणारे आम्ही सारे जातीवादी आहोत, हे ठळकपणे अधोरेखित होते. कडूबाईंची उदात भावना, अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणारे आहे.
कडूबाई खरात यांच्या आवाजातील अनेक गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. तीच गाणी लोकप्रबोधनाचं काम करत आहेत. तोच सूर प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत प्रबोधनाच्या वाटेवरून हलू न देता ताल धरायला लावत आहे. हा ताल सूर एका दिशेने निघाले तर निश्चितच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. कडुबाईंची मुलं बुलडाणा जिल्ह्यातील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. आता ती मोठी झाली आहेत. तेही कडुबाईंच्या संचात सोबत करत आहेत.
‘केवळ बाबासाहेब आणि बाबासाहेबांमुळेच आमच्या जीवनाचा उद्धार झाला.’ असं सांगून आपला आवाज, आपली कला त्या भीम, बुद्ध गीतांत ओतून नवा जोश पेरण्याचे काम करत आहेत. प्रत्येक गाणं संपल्यावर त्या ‘जयभीम’ करायला विसरत नाहीत. अशा कलावंतांमुळेच समाज घडत असते, बदलत असते. म्हणून या गोड गळ्याच्या गायिकेचं गाणं अधिक अधिक सुरेल व्हावं, हीच नितळ भावना.
वैजनाथ वाघमारे
छत्रपती संभाजी नगर
मो – 8637785963/7758941621

