लातूर दि. तालुक्यातील मौजे बोरगाव काळे येथील सुरेश व्यंकटी जाधव यांचा नवीन घराच्या वास्तू शांतीच्या दिवशी वीज प्रवाह असलेली विद्यूत तार तुटून पडल्याने मृत्यू झाला. १० मे २०२५ या दिवशी ही घटना घडली परंतू त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाचे केवळ उंबरठे झिजवावे लागत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करुनही त्यांना लाभ मिळाला नाही.
लातूर तालुक्यातील मौजे बोरगाव काळे येथील रहिवासी सुरेश व्यंकटी जाधव हे ठाण्यात राहात होते. गावात त्यांनी घर बांधले, नवीन घराची वास्तूशांती चा कार्यक्रम ठेवला होता. माञ त्याच दिवशी वाऱ्याने त्यांच्या घराजवळून गेलेली विद्यूत तार तुटून पडली. त्यामध्ये वीज प्रवाह सुरू होता. त्यामुळे विद्युत प्रवाहाच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मुरुड येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घरातील कर्ता पुरुष मरण पावला, पण त्याची साधी दखलही विद्युत विभागाने घेतली नाही. शासकीय नियमानुसार जाधव कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य करणे आवश्यक होते परंतू कोणी दादच देत नसल्याचा अनुभव त्यांच्या कुटुंबियांना आला. मुलगा विजय सुरेश जाधव याने तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली. परंतु आजपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले परंतु त्यांना न्याय मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

