
लातूर : येथील कृषि महाविद्यालयात देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन मंगळवार दि. 22 जुलै रोजी कृषि महाविद्यालय, लातूर, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, एमएसडी पशु आरोग्य, लातूर, देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशन, लातूर आणि ज्येष्ठ पशुवैद्यक संघ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना स्थानिक, राज्य व राष्ट्रीय स्तरावर देशी गोवंशाच्या जतन, संवर्धन व संशोधनाच्या भरीव योगदानासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाणे यांच्या हस्ते, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.नानासाहेब सोनवणे, अधिष्ठाता डॉ.अच्युत भरोसे, राजेशजी सन्यासी, डॉ.भास्कर बोरगावकर व कुणाल घुंगार्डे यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. डॉ.ठोंबरे हे आदर्श प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट विस्तार कार्यकर्ता व उत्तम प्रशासक म्हणून गेल्या 30 वर्षांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.
त्यांनी मराठवाड्यातील स्थानिक गोवंश देवणी व लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रातील खिलार, कोकणातील डांगी व कोकण कपिला व विदर्भातील गवळाऊ व कठाणी गोवंशाच्या उत्पादन व प्रजोत्पादन गुण अवगुणांबाबत सर्वंकष संशोधन केले आहे. शुद्ध देशी गोवंश हवामान बदल अनुकुल गुणात्मक व संख्यात्मकदृष्ट्या वृद्धींगत करण्याचे कार्य केले आहे.
त्यांनी आचार्य पदवीच्या 11 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 52 विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी 110 संशोधनाचे लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात, 1000 शेतकरी पशुपालक प्रशिक्षण/मेळावे, 25 रेडीओ/दूरदर्शन वरील मुलाखतीद्वारे शेतकरी पशुपालकांना मार्गदर्शन केले आहे. ग्रामीण भागात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अनुषंगिक नवउद्योजक निर्मितीचे कार्य केले आहे. त्यांनी लिहीलेली 14 पुस्तके महाराष्ट्रभर कृषि व पशुवैद्यक विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. गत 15 वर्षांपासून राज्यमंडळ व बालभारतीत लेखक असून उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, संशोधन, राष्ट्रीय सेवा योजना व पशुसंवर्धन अनुषंगिक अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी लातूरच्या वृक्ष चळवळ, मराठवाडा जनता विकास परिषद, लेखक व साहित्य मंडळ, गोशाळा, पशुधन छावण्या, रक्तदान शिबीरे व हरित सैनिकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे वनामकृविचे कुलगुरू प्रा.डॉ.इंद्र मणि, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, डॉ.मधुकर गायकवाड, संचालक शिक्षण डॉ.भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ.दिगंबर चव्हाण, पंडित उद्धवबापु आपेगावकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरूजी, डॉ.महादेव जगताप, बच्चेसाहेब देशमुख, शरद डुंगरवाल, राजेश रेवले, मुकुंद राजपंखे, राजेंद्र रापतवार, रणजित डांगे व डॉ.हणुमंत सौदागर यांनी अभिनंदन केले आहे.

