
आज शनिवार दिनांक २६ जुलै रोजी येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आवर्तन मासिक संगीत सभेला तब्बल १२५ महिने पूर्ण होत आहेत म्हणूनच ही संगीत सभा शतकोत्तर रौप्य महोत्सवी विशेष संगीत सभा होणार आहे. या संगीत सभेमध्ये जगप्रसिद्ध ज्येष्ठ गायक स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू तसेच प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांचे सुपुत्र युवा गायक श्री. अभेद अभिषेकी पुणे , यांचे गायन संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे ही संगीत सभा लातूर मधील जेष्ठ रसिक व सामाजिक कार्यकर्ते स्व. त्र्यंबकदासजी झंवर काका यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली आहे, लातूरच्या संगीत क्षेत्रातील अनेक कलावंतांना काकांचा सहवास लाभला आहे कलावंतांना काका नेहमीच प्रोत्साहन द्यायचे विविध ठिकाणी रंगमंच उपलब्ध करून द्यायचे मग तो कलावंत लहान असो वा मोठा, त्यामुळे सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात काकांचे नाव आजही आदराने घेतेले जाते,आणि तोच वारसा आज त्यांचे सुपुत्र डॉक्टर ब्रिजमोहन झंवर समर्थपणे चालवत आहेत.
अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी मागील १२४ महिन्यांपासून लातूरमध्ये आवर्तन मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते, या मासिक संगीत सभेमध्ये आजपर्यंत भारतातील अनेक दिग्गज कलावंतांनी आपले गायन वादन तसेच नृत्य सादर केले आहे.
आज होणाऱ्या १२५ व्या मासिक संगीत सभेत अभेद अभिषेकी यांना तबला साथ पुणे येथील सुप्रसिद्ध तबला वादक कार्तिक स्वामी तसेच संवादिनी साथ पुणे येथील प्रसिद्ध कलावंत श्री. माधव लिमये हे करणार आहेत. आजची संगीत सभा सायं ६ : ३० वाजता स्वानंद संस्कृती फंक्शन हॉल वाडा हॉटेलच्या जवळ, कस्तुराई मंगल कार्यालयाच्या बाजूला या ठिकाणी होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा सचिव डॉक्टर रविराज पोरे, कार्यक्रम नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, डॉ.संदीपान जगदाळे, डॉ. वृषाली देशमुख, श्री . किरण भावठाणकर, श्री . संजय सुवर्णकार, डॉक्टर ब्रिजमोहन झंवर तसेच समस्त झंवर परिवार व आवर्तन परिवाराच्या वतीने केले आहे.

