
सूर्यनारायण रणसुभे यांचा जन्म ०७ ऑगस्ट १९४२ रोजी हैद्राबाद संस्थानातील गुलबर्गा जिल्ह्यात झाला. घरी अत्यंत बिकट परिस्थिती. कारण खाणारी अकरा तोंड आणि कमावणारी चार हातं. त्यामुळे त्यांना रोजच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. तो काळही तसाच होता. परंतु अशाही परिस्थितीत रणसुभे शिकत राहिले. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक एक पाऊल पुढे टाकत राहिले. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत ते जीवन जगत होते. मात्र त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. शैक्षणिक प्रगतीतही ते आघाडीवर होते. ज्या वयात इतर मुलांसोबत खेळणे, बागडणे व्हायला हवे, परंतु हे त्यांच्या वाट्याला आलेच नाही. कारण रोजच्या जीवनसंघर्षात त्यांना आईवडिलांना हातभार लावावा लागला. यासाठी ते छोटे मोठे काम करत असत.वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत त्यांना नवीन पुस्तके घेता आले नाहीत. कपडे शिवून लेवता आले नाहीत, परंतु ते कोणत्याही गोष्टीचा खेद व्यक्त न करता ते जगत राहिले. जीवनाबद्दल आशावादी राहिले. रोज येणाऱ्या संकटांना तुडवताना माणूस आशावादी होतो. मजबूत होतो. कारण संकटे नेस्तानाबूत झाली की, जगण्याला उभारी येते. रोजचा संघर्ष तुडवून रणसुभे सर पुढे वाटचाल करत होते. कारण आजचा दिवस उद्या निश्चित बदलेल, ही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भूमिका होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अवांतर वाचनहीसुरू केले. त्या काळात असणारे उपलब्ध साहित्य ते वाचत होते. यात अनेक कादंबऱ्या त्यांनी वाचल्या. बालवयात त्यांचे शिक्षक शंभूनाथ यांच्यामुळे त्यांना साने गुरूजींच्या विचाराचे महत्त्व समजले. घरात छोट्याशा खोलीत अभ्यास होणारनाही म्हणून रणसुभे सर इतर मुलांच्या रूमवर जाऊन रात्रीला अभ्यास करत. कारण आजूबाजूच्या खेड्यातील मुलं तिथं रूम भाड्याने घेऊन शिक्षण घेत असत. गुणवत्ता एक अशी गोष्ट आहे की, ती सर्वांना आकर्षित करते, जवळ करते. हाच अनुभव रणसुभे सरांना आला. ते वर्गात पहिल्या पाचात येत होते. त्यामुळे त्यांचा सहवास कुणाला नको होता? रात्रीला चार पाच तास अभ्यास करून सकाळी ते घरी जात असत. शाळेव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत ते कामाला जात असत. तत्कालीन मॅट्रीक परिक्षेसाठी रणसुभे यांनी जीवापाड मेहनत केली. त्याचे फळही त्यांना मिळाले. राज्यात ते अकरावे आले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. रणसुभे सरांपेक्षा कमी मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वडील त्यांच्या घरी येऊन सूर्यनारायण मेडीकलला प्रवेश कधी घेणार? असे विचारू लागले. परंतु घरातील परिस्थितीपुढे त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी होते. कारण साडे चार वर्षांचा लागणारा खर्च, फिस भरण्याइतकी आर्थिक सक्षमता त्यांच्याकडे नव्हती. गुणवत्तेलाही आर्थिक आधार हवाच असतो, हे कटू वास्तव नाकारता येत नाही. अडचणीत आपला स्वार्थ साधणे ही मानवी प्रवृत्ती काही नवल नाही. यावर मात म्हणून आर्थिक संपन्न असलेल्या नातेवाईकांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याची हमी दिली. परंतु वाचनाने समृद्ध झालेल्या रणसुभे सरांच्या मनोभूमिकेला ते पटले नाही. त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. मग पुढे काय? हा प्रश्न होताच. मग त्यांनी बी. एस्सी. करण्याचे ठरवले. हे वर्ष होते सन १९६० चे.दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या वतीने हिंदी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना जाहीर झाली. यासाठी देशभरातून फक्त अकरा विद्यार्थी निवडले जाणार होते. याच शिष्यवृत्तीला लाभ मिळावा यासाठी त्यांचे शिक्षक प्रयत्न करू लागले. कारण रणसुभे सरांची परिस्थिती सर्वांना माहीत झाली होती. इतका गुणवत्ताधारक विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याची आर्थिक नाकाबंदी तुटली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले; पण फॉर्मवर फोटो लावण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु माणूस हा समाजशील प्राणी असल्याने दुसऱ्याच्या नाशात आनंद मानणाऱ्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखात आपला वाटा देणाऱ्या सत्प्रवृत्ती जिवंत आहेत. काळ कोणताही असला तरी चांगली माणसेच समाज निर्माण उभा करत आली आहेत. या फोटो प्रकरणातही त्यांच्या एका मित्राने आपली ओळख वापरून मार्ग काढला. आणि तिथून रणसुभे सरांच्या जीवनाचा मार्ग बदलला. त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर रणसुभे सर एम. ए. पर्यंत शिकले. मग पुढील शिक्षणासाठी अलहाबाद येथे गेले. तिथे त्यांना हिंदीतील दिग्गज साहित्यिकांशी भेटता आले. बोलता आले. त्यांचे लिखाण समजून घेता आले. याच विद्यापीठात त्यांना राममनोहर लोहिया यांना ऐकता आले. तिथेच त्यांच्या समाजवादी विचारांचा आणि मार्क्सवादी विचारांचाही प्रभाव पडत गेला. मात्र घरच्या परिस्थितीने शिकविलेला जीवनव्यवहार त्यांना मार्क्सच्या विचारांकडे वेगाने घेऊन गेला. एम. ए. पूर्ण केल्यानंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मग घरातील गरिबीचा अंधार फाकत गेला आणि चंद्रभानु सोनवणे यांच्या सहवासात त्यांच्यात सुप्त अवस्थेत दडलेला लेखक उजागर होत गेला.. मग त्यांनी लघुकथा, समीक्षणात्मक लेखनाला सुरुवात केली. तीन राज्यांच्या सीमा ओलांडून अध्ययन आणि अध्यापन करताना डॉ. रणसुभे सरांना जे जीवनानुभव मिळाले. त्या शिदोरीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अनुवादाकडे वळले. मग त्यांनी मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि वेगळ्या वळणावरच्या पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला. यात मराठी साहित्याला त्यांनी देशपातळीवर नेले. अनुवाद म्हणजे नवनिर्मितीच असते. यासाठी स्वतंत्र चिंतन, निरीक्षणं, लोकभाषेचे ज्ञान असावे लागते. शब्दानुवादापेक्षा भावानुवाद फार महत्त्वाचा असतो. हेच सूत्र डॉ. रणसुभे यांच्या अनुवादातून अधोरेखित झाले आहे. एकूणच त्यांच्या वाङ्मयीन वाटचालीत त्यांच्यावर मुन्शी प्रेमचंदांचा मोठा प्रभाव राहिलाआहे. यासोबतच वैचारिक भूमिकांच्या बाबतीत ते ठाम राहिले आहेत. ‘नास्तिकता ही काही परकीय उचलेली बाब नाही. ती तर आपल्या देशात पूर्वापार चालत आलेली आहे.’ यासाठी ते चार्वाकापासून ते आजच्या काळातील लोकांचे उदाहरणे देतात. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाबद्दलही त्यांचे मत तेच आहे. कारण रोजच्या अवघड जगण्याला सहज, सोपं आणि इतरांबरोबर माना-सन्मानाचं जीवन देणारा कोणताही विचार आपलाच होतो, यावर त्यांचा विश्वास आहे. डॉ. रणसुभे सरांचे साहित्य देशभरातील विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. ते एक सृजनशील लेखक आहेत. संवेदनशील कलावंतांनी अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, ही त्यांची आग्रही भूमिका आहे. हीच त्यांच्या जगण्याची वहिवाट आहे. आतापर्यंत काही निवडक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही ते विराजमान झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे.सृजनशील मराठी लेखकांच्या साहित्यकृती हिंदी भाषेमध्ये नेण्यात डॉ. रणसुभे यांचे खूप मोठे योगदान आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळाअगोदर पुस्तक (ग्रंथ) हेच समाजाच्या माहितीचे माध्यम होते. त्याच माध्यमाचा आधार घेऊन मराठी साहित्याचे किरणं सर्वदूर प्रकाशमान करण्याचे काम डॉ. सूर्यनारायण रणसुभे सरांनी केले आहे. म्हणून हिंदी भाषेतून देशातील वेगवेगळ्या भाषांमध्ये ती पुस्तके अनुवादाच्या माध्यमातून पोहोचली. आज सर्वत्र अनुवादित पुस्तकाची चलती आहे. मात्र या काळाचे ‘मनसुभे’ डॉ. ‘रणसुभे’ यांनी आधीच ओळखली होती. म्हणून त्यांनी अधिकाधिक पुस्तके अनुवादीत केली. त्यात अनेक साहित्य अकादमीसह राज्य शासन पुरस्कारप्राप्त पुस्तकांचा समावेश आहे. त्यामुळे ‘मराठवाड्यासह मराठीचं लोकसंचित’ सातासमुद्रापार नेण्यात रणसुभे यांनी मोलाची भर टाकली आहे. त्यामुळे आज सबंध देशात कसदार अनुवादक म्हणून अशी ओळख आहे.वैजनाथ वाघमारेशब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन)छत्रपती संभाजी नगर मो. ८६३७७८५९६३ / ७७५८९४१६२१

