
अण्णाभाऊ साठे हे जगातील एकमेव साहित्यिक ठरले आहेत की ज्यांच्या नावाने चळवळीचा उदय झालेला आहे.अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक तर होतेच पण ते कार्यकर्ते होते. आज समाजामध्ये चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून अण्णाभाऊ साठे सर्व प्रसिद्ध झाले आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रात असे दिसते की चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची सर्वत्र चर्चा होत असून समाज मनामध्ये परिवर्तनवादी ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी आज महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांचे विचार ,त्यांचे कार्य, त्यांचे चरित्र यांचे साहित्य, विचार व वाटचालीतून आज एक प्रेरणादायी नायक म्हणून प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे यांचा झालेला उदय हा महत्वाचा मानला जातो. अण्णा भाऊ साठे यांनी बहुजन समाजाला माणूस पण देण्यासाठी साहित्य सेवा दिली. सामान्य माणूस हा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची प्रेरणा होता. अण्णाभाऊंनी हाडामासाच्या माणसांना मोठेपण दिले. त्यांच्या व्यथा,वेदना, त्यांचे प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे विषय होतेच परंतु कष्टकरी , गरीब , आणि दारिद्र्याने पिचलेल्या आणि पोटासाठी संघर्ष करणारा प्रमाणे नीतिमान माणूस अण्णाभाऊ साठे उभी केली.

माणसांचा आदर आणि माणुसकीची कदर करणारे अण्णा भाऊ साठे यांचे लेखन म्हणजे जणू माणूसकीची मूर्तिमंत उदाहरणच आहेत ती आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात देतात. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन व कार्याची ते हयात असताना सर्वत्र उपेक्षा झालेली आपण पाहतो. साहित्य क्षेत्रात सर्व प्रकारात पादाक्रांत करताना त्यांनी उपेक्षित समुहाच्या स्त्री पुरुषांना नायक आणि नायिका म्हणून त्यांनी न्याय दिला मात्र अण्णाभाऊ साठे यांना त्या काळात विशेष न्याय मिळाला नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर तत्कालीन संपादक, प्रकाशक, चित्रपट निर्माते गब्बर झाले पण अण्णा भाऊ मात्र कफल्लकच राहिले. शेवटच्या काळात अण्णाभाऊ साठे यांची आर्थिक स्थिती प्रचंड प्रमाणात खालावली. त्याचबरोबर सोबत कोणीही नसल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती सुद्धा सकारात्मक राहीली नाही. अशा मरणासन्न अवस्थेत या लोकशाहीराने 18 जुलै 1969 रोजी शेवटचा श्वास घेतला.तसे पाहिले तर अण्णाभाऊ तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच म्हणजेच 1935 च्या सुमारास वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी कम्युनिस्ट विचाराने प्रभावित झाले होते.पुढे19 42 मध्ये ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करू लागले. मात्र डॉ. बाबुराव गुरव म्हणतात, त्याप्रमाणे अण्णा भाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने चाललेल्या चळवळी, त्यांची विचारसरणी यांच्याशी 1935 पासून विविध पातळीवर संबंधित होते, वाद संवादाच्या पध्दतीने ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समजून घेत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडत चाललेला होता. अण्णाभाऊ हे मातंग समाजात जन्माला आले म्हणजे दलितच होते तरीही ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर यांच्या पेक्षा सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट विचाराकडे का वळले, याचे उत्तर शरद पाटील यांनी अत्यंत सविस्तर पणे दिले आहे.ते म्हणतात, ‘आंबेडकरांनी मुंबईच्या गिरणी कामगारांत शतकाच्या अखेरीस प्रवेश केला असला, तरी आर्थिक लढे केवळ लाल बावटा गिरणी कामगार युनियन करीत असल्याने तीचे वर्चस्व सतरीपर्यंत कायम होते. त्यामुळे दलित असूनही अण्णाभाऊ कम्युनिस्ट झाले.अणाभाऊ जातिव्यवस्थेत जगत होते पण त्याचे डोके वर्ण व्यवस्थेत होते .या रस्सीखेचीची व्यथा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली होती. ‘मी कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांत अस्पृश्य झालो अशी अण्णाभाऊ साठे यांनी खंत व्यक्त केली होती अशी आठवण शरद पाटील यांनी आपल्या लेखात नमूद केली आहे.अण्णा भाऊ साठे सुरुवातीच्या काळात मार्क्सवादी विचार प्रवाहात होते हे आता सर्वश्रुत झाले आहे.मात्र त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध आंबेडकरवादाने भरलेला आणि भारलेला आहे. कोणताही लेखक हा तो ज्या परिस्थितीत, ज्या वातावरणात, ज्या परिसरात वाढतो किंवा घडतो त्याच्या घडल्याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, पर्यायाने त्यांच्या साहित्यकृतीचा उमटलेला दिसतो.

अण्णाभाऊ साठे यांना सुरुवातीच्या काळात मुंबईत गिरणी कामगार कम्युनिस्ट मित्र, कार्यकर्ते यांचा सहवास लाभला त्यामुळे ते मार्क्सवादी बनलेत पण परिस्थिती जशी जशी बदलत गेली. अण्णाभाऊ जाणिवेतून जाऊ लागले तसे त्यांना जाणीव झाली की भारतात वर्ग वादापेक्षा जातीवादाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि स्वतःला वर्गवादी म्हणणारेही स्वतःची जात सोडण्यास तयार नसतात याची जाणीव झाल्याने आणि इतर अनेक कारणांनी अण्णाभाऊंच्या मनातील आंबेडकरवाद पुढील काळात अधिक घट्ट झालेला आपण पाहतो. अण्णाभाऊ साठे यांच्या मृत्यू पर्यंत येथील कम्युनिस्ट कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राजकारणी दलित आणि मातंग समाजातील नेत्यांना अण्णाभाऊंचे स्मरण झाले नाही.नंतरच्या काळात अण्णाभाऊ लोकप्रिय झाले. अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1980 नंतर सर्वत्र साजरी केली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात मुंबईपर्यंत असलेल्या अण्णा भाऊंचे नाव नंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात हळूहळू पोचले. त्यात मातंग समाजाने व समाजाच्या तथाकथित नेतृत्वाला खतपाणी घालणारे सर्वपक्षीय राजकारणी यांचा वाटा महत्वाचा होता.राज्यात 1984 अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतरच्या काळात जवळजवळ सर्व जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे यांचे नाव पोचले. राजकीय पक्ष आणि संघटना अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने समाजकारण व राजकारण करू लागले.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ज्या मातंग समाजात झाला तो समाजघटक मराठवाड्यात सर्वत्र मोठ्या संख्येने आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर या जिल्ह्यात मातंग समाजाची लोकसंख्या राज्यात सर्वाधिक आहे तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात मातंग समाज हा सर्वाधिक संख्येने राहतो. त्यानंतरच्या काळात पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भ आणि मुंबईत या समाजाची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे हळूहळू अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने हा समाज संघटित होऊ लागला आणि नव्वदी नंतर मराठवाड्यात सर्वत्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती गावागावात साजरी होऊ लागली.एक ऑगस्ट या दिवशी शासकीय पातळीवर कार्यक्रम आणि उपक्रम होऊ लागले. त्याचे लोण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पोचले आणि सन 2000 नंतर आपण पाहतो की, मातंग समाजाच्या चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा उदय सर्वत्र झालेला आपणास दिसतो.नंतरच्या काळात आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने राज्यात अनेक संस्था-संघटना चळवळी सुरू झाल्या. राजकीय पातळीवरील मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिले जाऊ लागले. जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांची जयंती जशी सर्वत्र साजरी होते तशाच प्रकारे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मेळावे, सभा, कार्यक्रम, मिरवणुका, शाहीरी जलसे झडू लागले व या निमित्ताने मातंग समाजात काही प्रमाणात नवचैतन्य पसरले. राजकारणी मंडळी या समाजाला हायजॅक करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा, यांच्या पुतळ्याचा, त्यांच्या स्मारकाचा गैरवापर होऊन काही मंडळी राजकीय लाभ घेऊ लागली. केवळ मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून काही नेत्यांना राजकीय संधी मिळाली पण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा वापर करणाऱ्यानी अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबाकडेही लक्ष दिले नाही आणि मातंग समाजाकडे ही त्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले.आज एका बाजूला अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने चळवळी गतिमान झालेल्या आपणास दिसतात तर दुसऱ्या बाजूला समाजात राज्यातील नवबौद्ध आणि मातंग समाजामध्ये काही वेळा मतभेद , संघर्ष उफाळून येत असलेला आपण पाहतो त्यात काही राजकीय हस्तक्षेपही महत्त्वाचा ठरतो. तर दलित समुदायातील कांही विद्वान, समीक्षक यांनी जाणीवपूर्वक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष केलेलेही आपण पाहिले.आदरणीय रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, अर्जुन डांगळे, डॉ.यशवंत मनोहर ही मंडळी मात्र अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला व व्यक्तीमत्त्वास न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अनेकदा कांही दलित साहित्यिक डोळेझाक करतात त्यामुळे सुरुवातीला ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेली अनुल्लेखाने मारण्याची भावना नंतरच्या कालखंडात उच्चशिक्षित समाजामध्येही बळावली.अलिकडील काळात अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांचा आज एक मोठा वर्ग उदयास आलेला आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची, त्यांच्या साहित्याची नव्याने चर्चा होऊ लागली असून गेल्या दहा-पंधरा वर्षात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रचंड प्रमाणात विचारमंथन, चर्चासत्राचे आयोजन होऊन अनेक विद्यापीठांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे. आदरणीय गोविंद पानसरे यांनी या बाबतीत फार मोठं काम केले आहे.अणाभाऊ साठे यांच्या नावाने राज्यात साहित्य संमेलने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी झाली. ही जन्मशताब्दी अनेक अर्थाने महत्वाची ठरली.कारण या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अण्णाभाऊंच्या विचारांचा फार मोठा जनसागर झालेला आपण सर्वांनी पाहिला. अण्णा भाऊ च्या नावाने शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले. अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने ठिकाणी, साहित्य संमेलने, व्याख्यानमाला सुरू झाल्या आणि अण्णा भाऊंच्या कार्याची वैचारिक घुसळण सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतीची भारतासह चर्चा झाली . जन्मशताब्दी निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचा खरा सन्मान झालेला आपण पाहिला. वास्तविक पाहता कोणत्याही महापुरुषाला किंवा साहित्यिकाला जातीत बांधता येत नाही हे खरे आहे. त्याचबरोबर कोणत्याही साहित्यिकाला जातीच्या नजरेतून जेव्हा पाहिले जाते तेव्हा त्यांच्या साहित्याचे योग्य मूल्यमापन आपणास करता येत नाही आणि म्हणून आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी जातीच्या बाहेर जाऊन केवळ एक प्रतिभावंत साहित्यिक या दृष्टिकोनातून आण्णाभाऊ साठे यांना समजून घेऊन त्यांना मरणोत्तर तरी न्याय देणे हे महत्त्वाचे आहे.आज राज्यातील बहुजन समाज घटकात अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक म्हणून नव्हे तर चळवळीतील नायक म्हणून प्रचलित झालेले आहेत.महामानवाचा दर्जा अण्णाभाऊंना मिळत चाललेला आहे. आणि साहित्यिक ते महामानव आणि प्रेरणास्थान अण्णा भाऊ या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा होत चाललेला प्रचार हा एका समाज घटकाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करणारा आहे. आणि तो समाजाच्या हिताचा आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा प्रसार करणे, सध्याच्या काळामध्ये सर्व जाती समूहात अण्णा भाऊ साठे यांचे कार्य घेऊन जाणे हेच त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थाने वंदन करण्यासारखे आहे.
_डॉ. सोमनाथ कदम
मो.9423731382विशेष लेख 👇🏽


