

✍🏻 दीपरत्ना निलंगेकर
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या माळरानावर उभं राहिलेलं ‘सेवालय’ हे केवळ बालगृह नाही, ते एका ध्येयवेड्या तरुणाच्या आयुष्याचं, त्याच्या स्वप्नाचं, आणि समाजासाठी त्यागलेल्या आयुष्याचं सजीव उदाहरण आहे. प्रा. रवी बापटले या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने वयाची पन्नाशी पूर्ण करताना मागील पंचवीस वर्षे केवळ एच.आय.व्ही. बाधित मुलांच्या संगोपनासाठी खर्च केली.

तेव्हा समाज, कुटुंब आणि नातेसंबंध सगळ्यांनी पाठ फिरवलेल्या या निष्पाप मुलांना निवाराही कोणी द्यायला तयार नव्हते. त्यांच्यासाठी “सेवालय” उभं करणं म्हणजे नुसतं सामाजिक कार्य नव्हे – ती होती एक क्रांती! रवी बापटले यांनी स्वतःचं आयुष्य, वैयक्तिक सुख, कुटुंब या सगळ्यांचा त्याग करून ह्या बालकांनाच आपलं कुटुंब मानलं.

त्यांनी ‘बापटले’ हे आडनावही टाकून फक्त ‘रवी’ असं नाव स्वीकारलं, कारण ते प्रत्येक मुलासाठी केवळ एक पालक, मार्गदर्शक होते – जातीपातीच्या, नावाच्या ओळखीच्या पलिकडचं एक नातं.

तेथील हॅप्पी इंडियन व्हिलेज या संकल्पनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या परिसरात विवाहयोग्य बाधित मुलांचे विवाह लावून देणे, आणि त्यांचं आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पुढील पिढी तयार होणं – हे एक विज्ञान आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम ठरला.

परंतु… सध्या या नंदनवनावर संकटाचे सावट पसरले आहे.
अलीकडे एका अल्पवयीन मुलीने सेवालयातील राहत्या काळाबद्दल काही गंभीर आरोप केल्यामुळे प्रा. रवी यांना अटक झाली. या आरोपांची सत्यता ठरवण्याचे काम न्यायव्यवस्थेवर सोडून, आपण मात्र या कार्यकर्त्याच्या दोन तपांच्या सेवेचा न्यायपूर्ण, संवेदनशील आणि सामाजिक संदर्भात विचार करायला हवा.

शासनाच्या निरीक्षणात सध्या सेवालयातील जागा “बालगृहासाठी अयोग्य” असल्याचे नोंदवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नियमित भेट देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे निरीक्षण, मुलांचे समाधान, शिक्षण व राहणीमानाची चांगली व्यवस्था दाखवत आहेत.

या पार्श्वभूमीवर काही प्रश्न समाजासमोर उभे राहतात:
- एखाद्या आरोपाच्या आधारे संपूर्ण संस्थेचं मूल्यांकन होणं कितपत योग्य?
- एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कार्याला डाग लावणं, केवळ आरोपांवर आधारित असणं, हे किती नैतिक आहे?
- आणि सगळ्यात महत्त्वाचं – या संस्थेतील निराधार मुलांचं काय?
जर या संस्थेतील बालकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं, तर त्यांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, आणि मानसिक स्थैर्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल.

शासनाची जबाबदारी केवळ निरीक्षणपुरती मर्यादित नाही, तर न्याय्य आणि संवेदनशील व्यवस्थापन देखील आवश्यक आहे.
शासनाने एखादा अधिकारी दोन दिवस या परिसरात वास्तव्यास ठेवून थेट अनुभव घ्यावा — मुलांचे अनुभव, शिक्षण व आरोग्याच्या सोयी तपासाव्या, आणि तटस्थतेने व कृतीशीलतेने भूमिका घ्यावी.

एक गोष्ट मात्र नक्की — या नंदनवनात आजही हिरवळ आहे, चैतन्य आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं – मुलांचं हास्य आहे.
त्या हास्याला तडजोडीची सावली लागू देऊ नये, आणि सामाजिक भावनेतून उभं राहिलेलं हे घरटं – न्यायाच्या झगमगाटात विस्कळीत होऊ नये यासाठी आज जागृक समाजाने पुढे येणं आवश्यक आहे.
सामाजिक न्यायाच्या आणि मानवी संवेदनशीलतेच्या निकषावर प्रा. रवी यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करावा, आणि या निष्पाप मुलांच्या भवितव्यासाठी योग्य तो मार्ग शासनाने व समाजाने मिळून शोधावा – हाच खरा ‘सेवा’धर्म!

