- महारुद्र मंगनाळ
- मी शरीराने सेवालयात आणि मनाने लातूरच्या जेलमध्ये वावरतोय. काल आठ दिवस झाले. उठल्याबरोबर माझी परिक्षा सुरू होते. आज सेवाघराचा दरवाजा ठोठावला गेल्याने, मच्छरदाणीतून बाहेर येऊन दरवाजा उघडला.बालगृहातील छोट्या चार मुली आणि दोन मुलं.सगळ्यांनी एका सुरात विचारलं,सर ,आमचे बाबा कधी येणार आहेत? मला या प्रश्नाचा अंदाज होताच.मी म्हटलं,सोमवारी नक्की येणार आहेत. त्यातली मोठी मुलगी बोलली, तुम्ही हे तिसऱ्यांदा सांगू लागलाव…याआधी दोनवेळा सांगीतलं पण बाबा आले नाहीत… नक्की सांगा.
- मी म्हटलं, बाळ तुम्हाला फार कळत नसलं तरी,हे माहिताय की त्यांना कोर्ट सोडणार आहे… आज शनिवार उद्या रविवार कोर्टाला सुट्टी असते…
- पण सर..पोलिस बाबाला का घेऊन गेलेत?
- मी म्हटलं, सोमवारी तुमचे बाबा इथं आले की ,तुम्हीच विचारा..
- हा संवाद सुरू असतानाच दोन मुली डोळ्यातून अश्रू गाळत बोलल्या, तुम्ही खरच बोलताय ना सर?
- मी म्हटलं, मला जी माहिती आहे, ती मी देतोय…मी खरंच बोलतोय पण माझं म्हणणं खरं की खोटं हे ठरवणं कोर्टाच्या हातात आहे….
- त्यांचे रडवेले चेहरे बघून कुठल्याही क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी येण्याची शक्यता होती..चला जावा..शाळेत जायच्या तयारीला लागा,असं म्हणत मी त्यांना घालवलं.
- दरवाजा लावून आत आलो.फ्रेश होऊन कपभर काळी कॉफी बनवली.कप घेऊन, सेवागृहाबाहेर खुर्चीवर घोट घोट कॉफी पित बसलो. दोन मुलं दबकत आली..गुड मार्निंग सर…मी म्हटलं, गुड मार्निंग..
- बाबा कधी येणार सर…मी म्हटलं,सोमवारी.
- खरचं येणारायत का? मला सराला बघावं वाटतयं…
- मी म्हटलं,हो..
- पुन्हा तिघेजण आले…तोच संवाद.ते गेले.माझी कॉफी संपल्याने,मी उठत असतानाच, एक मुलगी रडतच आली..
- सर…बाबा कधी येणार…
- मी म्हटलं,येतील पण तूला रडायला काय झालं?
- पोलिस नेलेत म्हणं बाबाला म्हणत ती रडू लागली….उद्या येतील तू जा आता..असं म्हणत मी डोळे पुसत रूममध्ये येऊन दरवाजा लावून घेतला.
- आत येऊन खुर्चीवर बसलो.फक्त फळांवर राहू लागल्यापासून मरगळलेला होतो.हे फक्त मलाच जाणवत होतं.बाहेर पडलो आणि कोणीही लेकरू समोर आलं की,त्याचा ठरलेला प्रश्न…बाबा कधी येणार आहेत? या प्रश्नाची मला भीतीच वाटू लागलीय. मोठ्या माणसाने कोणी फोनवर असा प्रश्न केला की,मी तिरकस उत्तर देऊन, हा प्रश्न मला विचारणं चुकीचं असल्याचं लक्षात आणून देतो.काही फोन उचलत नाही.पण लेकरांना टाळणार कसं?
नऊ वाजता गावातील शाळेसाठी आणि साडेनऊ वाजता लातूरला कॉलेजसाठी मुलं गेली.मग बाहेर पडलो.विचार केला ,चालल्याशिवाय ही मरगळ जाणार नाही. पण केवळ पायच नाही तर,सगळं शरीर दुखत असल्यासारखं वाटत होतं.अशक्तपणामुळे फार चालू शकणार नाही, असंही वाटत होतं.पण हे असं वाटणं मानसिक असल्याचं ठामपणे वाटत होतं.कारण रात्री पुरेसं जेवण केलं होतं.बारा वाजता झोपलो तरी,सहा वाजेपर्यंत गाढ झोप झाली होती.सकाळी मोठा कपभर कडक काळी कॉफी पिली होती.त्यामुळं शरीराच्या तक्रारीकडं दूर्लक्ष करीत, चालत राहिलो.परिसराला तीन चक्कर झाल्या तेव्हा शरीर प्रफुल्लित झालं.मुडही छान बनला…
आणि सेवालयाच्या पहिल्या दिवसापासूनच्या एकापाठोपाठ एक शेकडो आठवणी जिवंत होत होत्या. मी माझ्या मनाला प्रश्न केला…इतकी वर्षे सलगपणे मी का येतोय सेवालयाला? हे नातं कशावर टिकून आहे?
आणि याचं उत्तर आलं,लेकरांसाठी आणि रवीसाठी! इथं लेकरं नसती तर कदाचित केवळ रवीसाठी मी आलो नसतो.मला लेकरांची आवड आहे. कुठल्याही लेकराशी माझी नाळ लगेच जुळते.सेवालयातील लेकरांशी मला अधिक ममत्व आहे,याचं कारण हे एचआयव्ही संक्रमित आहेत.यांच्या आई किंवा वडिलाने केलेल्या चुकीची शिक्षा या निरागस लेकरांना मिळालीय. जन्मतःच एचआयव्ही सारखा भयंकर रोग सोबत घेऊन आलेत. मृत्युपर्यंत यांची या रोगापासून सुटका नाही. अशा मुलांचं संगोपन रवी बापटले करतोय म्हणून त्याच्याशी मैत्री,त्याच्याबद्दल आदर आणि पाठबळ.
मुलांचं संगोपन अधिकाधिक चांगलं कसं होईल, यासाठी खारीचा वाटा उचलणं.
कुठल्याही राजकीय आश्रयाशिवाय ,
लोकसहभागातून रवीचं हे काम उभं राहात होतं.हे अनेकांना सलणारं होतं.तसंही गावातील मुठभर लोक ,सेवालयाला उठवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नरत होतेच.त्यांचं हेच तर जगण्याचं मिशन आहे.खुनी हल्ले,झाडं जाळणं,अंगावर चारचाकी घालणं चालूच होतं.काही झालं तरी रवीची घौडदौड थांबत नाही, हे लक्षात आल्याने हितशत्रूने भयंकर कट केला.अल्पवयीन मुलीचा वापर करून, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला.रवीला व इतरांना अटक झाली. आठ दिवसांपासून ते सगळे एका न घडलेल्या गुन्ह्यापोटी तुरुंगात आहेत. ते या गुन्ह्यातून निर्दोष सुटतील, याची मला खात्री आहे.पण त्यांना नक्की कधी जामीन मिळेल हे सांगणे कठीण आहे.त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.
मी माझ्या विचारांच्या गुंगीत फिरत असताना,अचानक ती एचआयव्ही संक्रमित २० -२१ वर्षे वयाची मुलगी आली.ती मानसिक रुग्ण आहे. तिला नियमित औषधोपचार चालू आहे. ती एकटीच आपल्या तंद्रीत फिरत असते.याआधी मला जेव्हा केव्हा ती सामोरी जायची तेव्हा तिचा मला एकच प्रश्न असायचा,जेवण केलात का सर? मी हो झालयं,असं बोलायचो.पण गेल्या शनिवार पासून ती समोर आली की,एकच प्रश्न विचारते,बाबा कधी येणार आहेत सर? मी उद्या परवा असं उत्तर दिलं की,ती पुन्हा विचारते,नक्की येणार का?
मी हो म्हटलं की,जाते.हे दररोज दिवसात दोन-तीन वेळा घडतं.आज पुन्हा तीच प्रश्नोत्तरं झाली.चालत थोडं पुढं गेलो तर एक मुलगा एका छोट्या लेकराला घेऊन येत होता.त्या लेकराच्या चेहऱ्यावरचं चैतन्य हरवलेलं.रडून डोळे सुजलेले.एक-दिड वर्षाची ती मुलगी असावी. ती अगदी सुरूवातीला मला बघून रडायची.तिची आई व इतरांनी माझी बाबा..बाबा म्हणून ओळख करून दिली. हळूहळू ती ओळखू लागली. टाटा,बाय करू लागली. आज माझ्या समोर आल्यानंतर मी तिला बाय म्हटलं तरी,ती निर्वीकार राहिली… मी तीस-चाळीस फुट पुढे गेल्यावर मागे वळून तिनं मला बाय ..म्हटलं तेव्हा माझा चेहरा आनंदाने फुलून गेला.हिचे आई-वडील या न घडलेल्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत.
रवी बापटले ,यांना गंभीर खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा हितशत्रू व व्यवस्थेची इच्छा पूर्ण झाली.. पण त्यांना हे कळत नाही की,त्यांनी केवळ रवीला नाही तर सेवालयाला,या निरागस बालकांनाही जेलमध्ये टाकलयं.या कोवळ्या लेकरांचं भावविश्व उध्दवस्त केलयं.ते सैरभैर झालेत.त्यांना हे नीटपणे कळत नाही की,त्यांच्या बाबांना पोलिस का घेऊन गेलेत? त्यांना जेलमध्ये का टाकलयं…. दैनंदिनी सुरळीतपणे सुरू असली तरी,एक भयंकर पोकळी अस्वस्थ करतेय.एकटे रवी नाही तर अख्खं सेवालय जेलमध्ये गेल्यासारखं मला वाटतयं.. माझीही अवस्था तशीच आहे. तरीही मी माझं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम रितीने टिकवून आहे.
कोणत्याच मुलाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही… म्हणून या माळरानावर मी एकटाच भटकतोय…वेड्यासारखा…
मात्र विचार शहाण्यासारखाच करतोय! ते टिकवणं गरजेचं आहे….

