माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उद्या तुम्ही पहिल्यांदा लातूरला येत आहात. निमित्त आहे — स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण. स्वागत आहे! पण लातूरकरांना फक्त फोटोंपुरतं स्वागत नको — कृतीतून स्वागत हवं आहे.
१️⃣ जिल्हा रुग्णालय
राज्याच्या पटलावर केवळ लातूर हा एकमेव जिल्हा असा आहे जेथे जनतेच्या मोफत आरोग्यासाठी जिल्हा रुग्णालय अस्तित्वात नाही .वर्षानुवर्षे प्रलंबित. तीन कोटींचा निधी मिळवायला पाच वर्षे. निधी आला, पण जीआरमुळे परत प्रश्नअडकला. भूमिपूजनाचा नारळ सोबत आणा, देवेंद्रजी! हे लातूरकरांच्या आरोग्याचं स्वप्न आहे.
२️⃣ रेल्वे कोच फॅक्टरी
2018 ला भूमिपूजन, 2024 ला लोकार्पण… पण 2025 ला अजून एकही बोगी बाहेर नाही! रोजगार कुठे? उद्या ‘हिरवा झेंडा’ घेऊन या आणि हा कारखाना प्रत्यक्ष सुरू करा.
3️⃣ गुन्हेगारी व ड्रग्स
लातूरची गुन्हेगारी आता महानगरांनाही मागे टाकते. ड्रग्स, डान्सबार, खून, चोऱ्या… तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. गृहमंत्री म्हणून ‘नशा फ्री, क्राईम फ्री लातूर’चा आराखडा जाहीर करा.
4️⃣ उजनीचं पाणी
35 वर्षं निवडणुकीत उजनीचं पाणी ऐकलं, तहान मात्र कायम. उद्या आलात, तर या प्रकल्पाचा ठोस शब्द द्या आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या.
देवेंद्रजी,
ही मागणी राजकारणाची नाही — अस्तित्वाची आहे. तुम्ही राज्याचे पालक आहात. पालकांना लेकरांच्या तहानेची आठवण करून द्यावी लागत नाही, ती भागवावी लागते.
उद्या लातूरला आलात, तर वचनांच्या फुग्यांनी नव्हे, कृतीच्या नारळांनी यावे.
रिकाम्या हातांनी नाही — लातूरच्या भवितव्याने परिपूर्ण हातांनी या!

