
लातूर शहरातील महानगरपालिकेच्या अखत्यारीतील एकमेव नाना-नानी पार्क हा नागरिकांच्या विरंगुळ्याचा आणि मुलांच्या खेळाचा महत्त्वाचा परिसर आहे. मात्र, या ठिकाणी खाजगी व्यावसायिकाला जागा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे लातूरकरांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

जरी काही खेळणी बसवली असली तरी मुलं खेळताना त्यांच्या पालकांसाठी बसण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तसेच स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक हक्काची बाग व्यावसायिकांच्या ताब्यात गेल्याने सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे — पार्कमधील खेळण्यांच्या दरांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. दर्शनी फलकावर गाड्यांसाठी 30 रुपये दर लिहिला असताना प्रत्यक्षात 40 ते 60 रुपये वसूल केले जात आहेत. छोट्या गाड्यांसाठी तब्बल 100 रुपये आकारले जात असून, ठरवलेल्या वेळेआधीच ग्राहकांना उतरवले जाते. शिवाय, गाड्या व्यवस्थित चार्ज नसल्याने मुलांच्या आनंदावर विरजण पडते आणि नागरिकांची उघड फसवणूक होते.
मागणी:
लातूर महानगरपालिकेने तात्काळ या खाजगी व्यावसायिकाचा करार रद्द करून नाना-नानी पार्क पुन्हा नागरिकांच्या ताब्यात द्यावा. मुलांना खेळण्यासाठी, कुटुंबांना विरंगुळ्यासाठी आणि लातूरकरांना त्यांच्या हक्काची बाग परत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

