
लातूर प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीतील भगवान नगर परिसरात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट २०२५) एक हृदयद्रावक घटना घडली. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी वानराला विजेच्या खांबाचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पाहून परिसरातील ग्रामस्थ हेलावून गेले.
या मयत वानरावर भगवान नगर येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरालगत असलेल्या जागेत धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी येत्या बुधवार (दि. २० ऑगस्ट) रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याने ग्रामस्थांनी हनुमानभक्तीचा संदर्भ देत वानराचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला.
आजच्या धावपळीच्या काळात माणसांना माणसांसाठी वेळ काढणं कठीण झालेलं असताना मुक्या प्राण्यांबाबत असलेली माणुसकी दाखवत या घटनेत ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला.
या अंत्यसंस्कारावेळी ॲड. किरण बडे, ॲड. प्रभाकर केदार, महादेव काका जमादार, विष्णू शिंदे, रघुनाथ गिरी, परमेश्वर माने, श्रीहरी दुवे, वाल्मिक ढाकणे, ॲड. नाथराव केदार, अरुण श्रीमंगले, बालू मुळे, पवार, भानुदास केळे, पिंटू हराळे, राम कापरे, गोबाडे लाईनमन आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
👉 या घटनेमुळे काशिलिंगेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांच्या माणुसकीच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

