
लातूर, दि. १४ सप्टेंबर २०२५ :
लातूरच्या बौद्धनगरातील वैशाली बुद्ध विहारात बुद्ध धम्म वर्षावास या पुनीत सुसंस्कार पर्वानिमित्त उपासक–उपासिका संस्कार शिबिराचे तसेच आमदार संजय बनसोडे यांचा “महाराष्ट्र रत्न” या लंडनमध्ये मिळालेल्या सन्मानप्राप्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूजनीय भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी भूषवले होते. पूजनीय भिक्खु महाविरो थेरो, भिक्खु पय्यानंद थेरो यांचीही या वेळी विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये विनोद खटके, अॅड. व्यंकटराव बेद्रे, माजी नगरसेवक सचिन मस्के, नवनाथ आल्टे यांचा समावेश होता.

सत्काराला उत्तर देताना आमदार संजय बनसोडे म्हणाले –
“जुन्या पिढीने उभारलेला हा विहार आज आंबेडकरी चळवळीचे खरे शक्तिस्थान ठरले आहे. नव्या पिढीने व्यसनांपासून दूर राहून धम्म आचरण स्वीकारणे हीच खरी समाजाला देणगी आहे. वैशाली बुद्ध विहारातील हा सत्कार माझ्या आई–वडिलांनी केला असे मी मानतो.”
यावेळी त्यांनी वैशाली बुद्ध विहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच ग्रंथालयासाठी दहा लाख रुपयांच्या फर्निचरची घोषणा करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
अध्यक्षीय भाषणात पूजनीय भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले –
“विहाराची उभारणी झाली आहे, पण खरी गरज आहे ती माणसं घडवण्याची. ग्रंथालय हीच खरी संपत्ती आहे. पुस्तकांच्या संगतीतूनच माणसाचा संस्कार आणि समाजाचे भविष्य उज्ज्वल घडते.”
प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाल्यार्पण करून वंदना करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले, तर आभार सूर्यभान लातूरकर यांनी मानले.
लातूर शहरातील उपासक–उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण विहार प्रांगण धम्म, समता आणि मैत्रीच्या संदेशाने उजळून निघाले.

