
काळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज – विश्वास देवकर

जळगाव – “पत्रकार हा समाजाचा कणा आहे. परंतु बदलत्या मीडिया परिदृश्यात त्यांच्यासमोर नवनव्या आव्हानांचा डोंगर उभा आहे. संघटनेशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडवणे अशक्य आहे. आमची लढाई ही पत्रकारांच्या हक्कासाठी आहे,” असे व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी स्पष्ट केले.
अमळनेर येथील मंगलग्रह मंदिर परिसरात व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचा दोन दिवसीय राज्यस्तरीय केडर कॅम्प उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या सुमारे २५० प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे पत्रकार संघटनात्मक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली.
या कॅम्पमध्ये पत्रकारितेतील बदलते पैलू, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने, महिला पत्रकारांचे प्रश्न, स्थानिक स्तरावरील समस्यांपासून डिजिटल युगातील कौशल्ये, आरोग्य विमा, कायदेशीर मदत अशा ठोस मुद्यांवर सखोल चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी तळागाळातील पत्रकारांना प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली.
प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी पत्रकारितेच्या बदलत्या वाटचालीवर विचारमंथन करताना सांगितले की, “आज पत्रकारिता फक्त वृत्त द्यायची प्रक्रिया राहिलेली नाही. जबाबदार संवाद साधणे, समाजाला दिशा देणे व नवे प्रयोग करणे ही काळाची गरज आहे. पत्रकारितेला काळानुसार नवा आकार देण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न आवश्यक आहेत.”
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ‘ग्लोबल महातेज’ यांचे प्रकाशन करण्यात आले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅम्पचे संयोजन दिगंबर महाले व अमळनेर शाखेसह कोर टीम महाराष्ट्रने केले. समारोपप्रसंगी संदीप काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून आगामी उपक्रमांची रूपरेषा मांडली.

