
धारवाड :
लातूरचे सुपुत्र, आदरणीय गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी यांचे पटशिष्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पं. मुकेश जाधव यांना धारवाड येथे उस्ताद बालेखान स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा मान म्हणून देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या कारकीर्दीतील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
औसा येथील रहिवासी असलेल्या पं. जाधव यांनी तबल्याचे शिक्षण तब्बल १६ वर्षे पं. शांताराम चिगरी गुरुजींकडे घेतले. गुरुपरंपरेतील या साधनेसह त्यांनी स्वतंत्र तबलावादनाची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसित केली असून, आज ते देश-विदेशातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करीत आहेत.

पं. जाधव यांनी भारतातील सर्व प्रमुख संगीत संमेलनांत आपली कला सादर केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संगीत महोत्सवांमध्येही त्यांचे वादन दाद मिळवून गेले आहे. अनेक विख्यात गायक-वादक कलाकारांना त्यांनी साथसंगत केली असून, स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणातही त्यांना एक विशेष स्थान आहे.
आपल्या गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार व संगीत परंपरेचे संवर्धन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संगीत साधनेला यापूर्वीही विविध पुरस्कार व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
या मानाच्या पुरस्काराबद्दल सूरताल परिवाराच्यावतीने श्रीमती सुमित्रा चिगरी, श्री अंगद गायकवाड, श्री सोनू डगवाले, डॉ. संदिपान जगदाळे, सौ. मीनाक्षीताई कोळी, श्री संजय सुवर्णकार, श्री अमर कडतने, श्री हरीश कुलकर्णी, श्री परमेश्वर पाटील, श्री तेजस धुमाळ, श्री वेंकट काळे आदी गुरुबंधूंनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
संगीत साधनेचा उच्च दर्जा आणि परंपरेला वाहिलेली अखंड निष्ठा यामुळे पं. मुकेश जाधव हे नाव आज संगीतविश्वात एका उज्ज्वल परंपरेचे द्योतक ठरत आहे.

