लातूर :प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कथित मनमानी कारभार, दलाली व भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी लातूर जिल्हा युवा मोटार मालक चालक संघ आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीने कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने निवेदने देऊनही भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कसलीही दखल न घेतल्याने संतापलेल्या वाहतूकदारांनी अखेर संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत आंदोलनकर्त्यांनी थेट लढाईचे रणांगण उघडले आहे.

१५ सप्टेंबर रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणकर्त्यांचा ठाम इशारा आहे की, “जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत आणि भ्रष्टाचाराविरोधात ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.”
उपोषणादरम्यान वाहतूकदारांच्या अनेक ज्वलंत मागण्या मांडण्यात आल्या –
- दलालांच्या साखळीला आळा घालावा
- परवाने व परवानग्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी
- अधिकाऱ्यांकडून होत असलेली जबरदस्ती व लाचखोरी त्वरित थांबवावी
- सामान्य चालक-मालकांना न्याय द्यावा
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण सध्या रजेवर असल्याने आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्र. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी स्वीकारले.
या उपोषणात जितेंद्र भावे, ॲड. सैफ कोतवाल, संदीप पाटील, इनायत सय्यद, विलास लंगर, सचिन मोटे, वेदप्रकाश भुसनुरे, माधव सूर्यवंशी, अमोल शिंदे, ॲड. सचिन बोरगावकर, सोमनाथ मेदगे यांचा सहभाग असून, जिल्हाभरातील वाहतूकदार या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहेत.
लातूर शहरात या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून ठोस तोडगा न काढल्यास लातूरमध्ये वाहतूकदारांचा रोष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

