
लातूर- प्रशासकीय स्तरावर होत असलेल्या हालचालींचा वेग पाहता लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी ‘माझं लातूर परिवार’ सातत्याने पाठपुरावा करत आहे. या प्रश्नावर आता मंत्रालयीन स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या असून भूमिपूजन लवकरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज माझं लातूरच्या शिष्टमंडळास दिले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले यानंतर शिष्टमंडळाशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला. जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रुग्णालयाच्या जागेचा व निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर माझं लातूर परिवाराने जिल्हा प्रशासन, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या लातूर दौऱ्यात या प्रश्नाचे निराकरण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्र्यांनी एका महिन्यात भूमिपूजन होईल असे जाहीर केले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ‘माझं लातूर परिवाराने आत्मक्लेश करण्याचा इशारा देत मुंडन आंदोलनाची घोषणा केली होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने माझं लातूरशी संपर्क साधत शासकीय स्तरावर सुरु असलेल्या प्रक्रियेची माहिती देत हा प्रलंबित विषय अंतिम टप्प्यात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आत्मक्लेश आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय परिवाराने घेतला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी पालकमंत्री भोसले म्हणाले, “११ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. प्रस्ताव सध्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांकडे असून, मुख्यमंत्री यांच्या शिफारशीने तो आठ दिवसांत मंजूर होईल. त्यानंतर तात्काळ भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होईल.”
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीत पालकमंत्र्यांनी रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरात लवकर होईल असा विश्वास दिला. आरोग्य विभागाने याबाबत जलद कार्यवाही करून रुग्णालयाचे काम प्रत्यक्ष सुरू व्हावे यासाठीचे प्रयत्न करावेत अशी मागणी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे केली. तुम्ही निश्चित रहा लातूरकरांवरती मुंडन करण्याची वेळ मी येऊ देणार नाही असे मिश्किलपणे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
शिष्टमंडळात दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, शिरीषकुमार शेरखाने, उमेश कांबळे, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, अरविंद रेड्डी यांचा समावेश होता. एकूणच प्रशासकीय हालचाली आणि पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखवलेला विश्वास पाहता लातूरकरांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला आता लवकरच पूर्णविराम मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

