
शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार
खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नका
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
लातूर तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथे शेतकऱ्यांना धीर दिला

लातूर दि.२५(प्रतिनिधी)- शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेत जमीनच वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची गरज आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.तुम्ही खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका अशी कळकळीची विनंती ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूर तालुक्यातील मौजे तांदुळवाडी आणि तांदुळजा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मिलींद नार्वेकर, संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण, माजी आमदार दिनकर माने, आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, संतोष सोमवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नंतर उध्दव ठाकरे यांनी ही सर्व परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कठीण परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. कोणीही खचून जात टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का ? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जमीनच वाहून गेल्याने पुढील हंगामही अडचणीत आला आहे. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्याच जाणून घेतल्या नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
केवळ पिकांचे नुकसान झाले आहे असे नाही तर जमीनच वाहून गेली आहे. शेतकरी किती अडचणीत आला आहे, याची सरकारने जाणीव ठेवावी, आता शेतकऱ्यांना जगवण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, येथे अवर्षण हे नेहमीचे आहे. मात्र, पहिल्यांदाच येथे अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे येथील नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर येते की नाही, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमुक्तीची मागणीही सरकारकडे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

