बोरवटी भुकंपाचा केंद्र बिंदू

लातूर दि. २६(प्रतिनिधी)-एकीकडे सतत झोडपणारा पाऊस, नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि दुसरीकडे जिल्ह्यात जाणवणारे भुकंपाचे धक्के ही नैसर्गिक आपत्ती लातूरकरांनी धडधड वाढवत आहे. ३० सप्टेंबर १९९३ च्या भुकंपाच्या आठवणी आता पुन्हा जागृत होत आहेत.
या वर्षी लातूरकर नैसर्गिक आपत्तीस तोंड देत आहेत. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने तांडव मांडले होते. पावसाळ्यात आजपर्यंत कधी बघितली नाही अशी पुर परिस्थिती निर्माण झाली. ही नैसर्गिक आपत्ती कमी होती की काय म्हणून भुकंपाची मालिकाच सुरू झाली आहे. अगोदर लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला हे भुकंपाचे केंद्र होते. नंतर कासारशिरसी परिसरात भुकंपाचा धक्का बसला. तर आज पुन्हा लातूर तालुक्यातील मौजे बोरवटी हा भुकंपाचा केंद्र बिंदू ठरला आहे.
आज दिनांक 26.09.2025 रोजी साधारणपणे सकाळी 6.30 वाजे दरम्यान मौजे बोरवटी तालुका जिल्हा लातूर या गावात भूकंपाचे धक्के जाणवले . यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी करण्यात आली असता 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे त्यांचेकडून कळविण्यात आले. सदरील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

