
स्वतःच्या वडिलांच्या दुःखद निधनाचे ओझे हृदयात साठवूनही पूरग्रस्तांच्या वेदनांना अधिक महत्त्व देणारे अधिकारी म्हणजे मा. मैनक घोष, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव.
कालच मा. घोष साहेबांचे वडील कैलासवासी माणिकराव घोष यांचे आजाराने दुःखद निधन झाले. धाराशिव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या या कुटुंबाचा सोलापूरशी कुठलाही संबंध नसतानाही साहेबांनी अत्यंत साधेपणाने आणि कोणताही दिखावा न करता वडिलांचा अंत्यविधी सोलापूर येथे पार पाडला.

परंतु इतक्यावरच न थांबता, अंत्यविधी पार पडल्यानंतर केवळ काही तासांतच मा. घोष साहेब दुपारी तीन वाजता वडगाव सिद्धेश्वर येथे फुटलेल्या तलावाची पाहणी करण्यासाठी स्वतः हजर झाले. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना, स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला दुय्यम मानून शेतकरी-गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी घटनास्थळी धाव घेणारा अधिकारी म्हणजे जनतेसाठीची खरी आशा आहे.
मा. घोष साहेब हे अतिशय सुसंस्कृत कुटुंबातील असून, त्यांच्या साधेपणामुळे व सेवाभावामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच लोक त्यांच्याविषयी आदर व आपुलकीने बोलतात. एवढ्या उच्च पदावर असूनही त्यांनी न मिरवलेला डामडोल, नम्र स्वभाव, आणि संकटग्रस्त जनतेला दिलेला जीव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष पैलू आहेत.
आज धाराशिव जिल्ह्याला असा संवेदनशील, संस्कारित आणि जनतेच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होणारा मुख्य कार्यकारी अधिकारी लाभला आहे, ही धाराशिवकरांची मोठी भाग्यरेषा आहे.
🙏 कैलासवासी माणिकराव घोष यांना श्रद्धांजली व मा. घोष साहेबांना व त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ति लाभो, हीच प्रार्थना.

