
लातूर : भारतीय बौद्ध समाजाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहा लाख अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन सामाजिक क्रांतीला नवे वळण दिले. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. त्याच परंपरेत लातूर शहरातील आनंद नगर येथे यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
आनंदनगर समाज मंदिरावर गुप्त वार्ता शाखेच्या पोलीस निरीक्षक माधवी मस्के यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर तथागत चौक येथे सविता सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिराचंद सितापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. धम्मदिप बलांडे यांनी मानले.
यानंतर आनंदनगर येथून आंबेडकर पार्कपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंचशील ध्वज यांच्या जयघोषात ही पदयात्रा आंबेडकर चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक मार्गे पुढे सरकत आंबेडकर पार्क येथे समारोपास आली.
समारोप प्रसंगी त्रिसरण पंचशील व २२ प्रतिज्ञा यांचे वाचन करण्यात आले. या पदयात्रा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मंडळाचे राहुल डुमणे, प्रा. हिराचंद सितापुरे, ॲड. धम्मदीप बलांडे, प्रताप कांबळे, बाबा गायकवाड, डॉ. सितम सोनवणे, लाला सुरवसे, ॲड. संजय सितापुरे, दिलीप सुरवसे, दत्तू गवळी, डॉ. गणेश कांबळे, ॲड. रुपेश गायकवाड, लाला गायकवाड, बंटी कांबळे, रघुनाथ कांबळे, तुकाराम वाघमारे, प्रेम गायकवाड, नारायण सूर्यवंशी यांच्यासह आनंदनगर महिला मंडळाच्या जमुनाताई गायकवाड, विमलताई डुमणे, गंगुबाई गायकवाड, जयश्री गायकवाड, वर्षा डुमणे, मिताली सीतापुरे, शोभा मुडबीकर, सुभद्रा इंगळे, सुकुमारबाई वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करत वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेला समता, बंधुता आणि बौद्ध मूल्यांचा मार्ग आज अधिकाधिक आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जातपात, अंधश्रद्धा, अन्याय, विषमता यावर मात करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून नवा समाज घडविण्याचा प्रेरणादायी दिवस आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

