
हैद्राबाद : मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘साहित्यकट्टा, हैद्राबाद’ या संस्थेच्या वतीने ‘साहित्यवड’ या दिवाळी अंकाच्या पाचव्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच हैद्राबाद येथे उत्साहात पार पडले.
५ ऑक्टोबर २०२५ रोजी नल्लागंडला येथील अपर्णा सायबरझोनच्या क्लबहाऊसमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या संचालिका डॉ. भारती कुलकर्णी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या संस्थेच्या संशोधन कार्याची माहिती देताना साहित्य आणि विज्ञान यांच्यातील संबंध अधोरेखित केले. त्यांच्या मुलाखतीचाही समावेश या अंकात करण्यात आला आहे.

कार्यक्रमात अंकातील काही निवडक लेख, कथा आणि कवितांचे सादरीकरण लेखकांनी स्वतः केले. विद्या देवधर यांच्या ‘वंदे मातरम’ लेखाचे वाचन उज्वला धर्म यांनी केले. तसेच अवधूत कुलकर्णी आणि कांचन जतकर यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. मेघा देशपांडे यांनी डॉ. नयना जोशी यांच्या ‘मारुती चित्तमपल्ली’वरील लेखाचे वाचन केले, तर पुष्कर कुलकर्णी यांनी डॉ. पर्सी अवारी यांच्या ‘गिधाडे व संवर्धन’ या मुलाखतीतील काही भाग सादर केला.
संदीप केळकर, आदिती खांडेकर आणि आरती कोडग यांच्या लेखांचे तसेच आरती कोडग यांच्या कथांचे अभिवाचनही झाले. अंकातील रेखाचित्रे प्रकाश धर्म आणि ज्योती कुलकर्णी यांनी रेखाटली असून आकर्षक मुखपृष्ठ रश्मी नेमीवंत यांनी साकारले आहे. संपादकीय अभिलाषा कुलकर्णी यांनी लिहिले असून अंकात अठरा कविता, सतरा कथा, दोन मुलाखती, दोन रेखाचित्रे, तसेच एकवीस लेख, प्रवासवर्णने आणि वैचारिक लेखनाचा समृद्ध असा मेजवानीचा ठेवा आहे.
या साहित्यिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण डवलेकर, पुष्कर कुलकर्णी, प्रवीण कावडकर, व्यंकटेश कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, प्रिती पांडे, आरती कोडग, तृप्ती आगाशे, उज्ज्वला धर्म, प्रिया जोशी, अपर्णा कुलकर्णी, कविता वारके आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गेल्या आठ वर्षांपासून ‘साहित्यकट्टा, हैद्राबाद’ या संस्थेमार्फत मराठी साहित्यिक चळवळ सतत जोपासली जात आहे. महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याची नाळ जिवंत ठेवत ‘साहित्यवड’ दिवाळी अंक हे त्या चळवळीचे एक जिवंत आणि प्रेरणादायी प्रतीक ठरले आहे.
— ✍️ प्रतिनिधी

