
लातूर :
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून ओला दुष्काळ घोषित करावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांतील मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या काठावरील शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून शेतजमिनींवर फक्त दगडगोटे उरले आहेत. या जमिनींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करावा.
तसेच, बागायती व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, गाळाने भरलेल्या विहिरी, वाहून गेलेल्या मोटारी, पाईपलाईन व ठिबक संचासाठी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय पूरग्रस्तांच्या घरांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, चाऱ्याची टंचाई आणि वीज वितरण व्यवस्था बिघडलेली असल्याने तातडीने दुरुस्ती व मदतकार्य राबवावे, असेही निवेदनात नमूद आहे. जनावरांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवालाची सक्ती न करता, इतर नोंदींवर आधारित मदत द्यावी, अशीही मागणी पक्षाने केली.
“शेतकऱ्यांचे वीज बिल, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेती अवजारे यांवरील कर्ज त्वरित माफ करून सातबारा कोरा करावा आणि नवीन कर्जपुरवठा सुरु करावा,” अशी ठाम भूमिका पक्षाने घेतली.
या सर्व मागण्या राज्य सरकारने येत्या 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत मान्य कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिला.
या प्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ॲड. संभाजीराव पाटील, शहराध्यक्ष राजा मणियार, इंजि. विनायक बगदुरे, तसेच मल्लिकार्जुन करडखेळकर, संतोष शिंदे, परमेश्वर पवार, प्रा. प्रशांत घार, प्रा. माधव गंगापुरे, लातूर तालुकाध्यक्ष बकतावर बागवान यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे हित, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रक्षण आणि अतिवृष्टीग्रस्तांचे पुनर्वसन हे शासनाचे तातडीचे कर्तव्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शासनाला जागे होण्याचा दिला ठाम इशारा.

