
अभय मिरजकर
सामाजिक काम म्हणजे ५०० रुपयांचे बिस्कीट चे पुडे आणि केळी . त्याच्या प्रसिद्धी, फोटो, व्हिडिओसाठी ५ हजारांचा खर्च . त्यानंतर नाष्ट्यासाठी स्वतंत्र ५ हजारांचे खर्चाचे बजेट अशी मानसिकता असणाऱ्या सामाजिक, सेवाभावी संस्था कार्यरत असल्याचे दिसून येते. पण प्रसिध्दी पासून दूर राहून आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून काम करणारी एक संस्था म्हणजे शिवश्री फाऊंडेशन. वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ११ एकर जागेवर ४२०० पेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचे काम त्यांनी केले आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत नेञ शस्त्रक्रिया, एवढेच नव्हे तर सेंद्रिय आणि जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ही यांनी केले आहे.

२०१२ मध्ये उल्हास डोलारे, शैलेश कुमदाळे, कृष्णकुमार पवार, अविनाश टेळे, गौरीशंकर माकणे, अमोल सगर, ॲड. प्रिया आगळे यांनी शिवश्री फाऊंडेशनची सुरुवात केली. आरोग्य, कृषी, शिक्षण, वन संवर्धन क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवण्यात आले. संस्था हे साधन कमावण्यासाठी नाही तर सामाजिक कार्य करण्यासाठी करायचे हा निश्चय करून कामाला सुरुवात झाली.

दृष्टी रक्षा प्रकल्पांतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, मोफत शस्त्रक्रिया यासाठी २७ गावांमध्ये ५७३९ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. ४२१५ मोफत चष्मे वाटप करण्यात आले.५०६ जणांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिवश्री वनराई प्रकल्पांतर्गत ५ ठिकाणी वनराई तयार करण्यात आल्या. ११ एकर क्षेत्रावर ४२०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सह्याद्री देवराई, वन विभाग, देवराई फाऊंडेशन, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव, देवंग्रा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, दाभा ता. कळंब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. १२० प्रकारांच्या दुर्मिळ वृक्षांची लागवड अडीच एकरावर करुन जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे.

शिवश्री भुमिनायक प्रकल्पांतर्गत सेंद्रिय व जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. औसा, लातूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ५५ गावांमध्ये शिबीर घेण्यात आले.११५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. जिवामृत तयार करणे, गांडूळ खत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मिती या माध्यमातून १०० एकर शेती सेंद्रिय पध्दतीने करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी स्वतः साठी सेंद्रिय शेती सुरू केली याचे प्रमाण अल्प आहे पण जागृती करण्यात यश आले हे संस्थेचे यश आहे अशी कृतज्ञाची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील कोणतेही काम प्रसिद्धीच्या हव्यासातून केले नाही.

