
लातूर: एडीएम ॲग्रो, कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “एडीएम स्वयंसेवक सप्ताह” अंतर्गत लातूर शहरात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ वार रविवार रोजी भव्य स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश सामाजिक जबाबदारी जोपासत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि “स्वच्छ लातूर हरित लातूर” या संकल्पनेला बळकटी देणे हा होता.

अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. गांधीजींच्या ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ या संदेशाचे स्मरण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. अभियानाचे उद्घाटन नगरविकास विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार डोके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. दिनकर जाधव, मोहन भिसे, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कलिम शेख, श्रीपाद माने, गिरीश पाटील, अशोक खानापुरी, तसेच एडीएमचे अधिकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

या भव्य स्वच्छता अभियानात ६०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे १० किमी (दुतर्फा) रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. अभियानातून शहरातील स्वच्छता राखण्याचा आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश दिला. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ.दिनकर जाधव यांनी स्वच्छता हि आपली नित्य दिनचर्या असून प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह आपले गाव, आपले शहर या ठिकाणच्या सामाजिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत आग्रही राहण्याचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थी दशेपासून स्वच्छतेच्या संस्काराचे बीज रुजवून महात्मा गांधींना अभिप्रेत असणारा स्वच्छ, सुंदर देश घडविण्यासाठी कटिबद्ध होण्याबाबत विचार मांडले. या प्रसंगी गिरीश पाटील यांनी एडीएमच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देताना शेतकरी आणि ग्राहक यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. अंजली रितू यांनी एडीएमच्या उपक्रमाची माहिती विशद करताना सांगितले कि, १६५ देशांमध्ये १२ ते १९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एडीएमच्या जागतिक स्तरावरील सामाजिक कटिबध्दतेची माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत एडीएम सामाजिक निधी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही सांगितले. या सत्रात स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
स्वच्छता अभियान नियोजनात अंजली रितू यांनी महत्वाची भूमिका साकारली. कृषि महाविद्यालय, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्थांशी समन्वय साधून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यामध्ये कृषी महाविद्यालयाकडून एडीएमच्या शास्वत शेती उपक्रमाचे समन्वयक डॉ. विजय भामरे, महानगर पालिकेचे स्वछता विभाग प्रमुख कलीम शेख यांचे मोठे योगदान लाभले. सदरच्या अभियानातून तब्बल १८,८७० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एडीएम, कृषी महाविद्यालय, महानगरपालिका प्रशासन यांनी परिश्रम घेत हे स्वच्छता अभियान यशस्वी केले.

