
लातूर, दि. १० :
भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावर विराजमान असलेल्या माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याने देशातील न्यायप्रेमी नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. या अभूतपूर्व घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, महामहिम राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे महासंघाने म्हटले आहे की, “भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा अपमान आहे. न्यायालयावर हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरच थेट प्रहार असून, दोषींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी.”
या वेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ लातूरचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली गणेश राठोड, नागरत्न कांबळे, दत्तात्रय सूर्यवंशी, सुभाष मस्के, राहुल गायकवाड, सुधीर बोकेफोडे, निलराज बनसोडे, अनिता हुडे, महेश राठोड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. महासंघाने सरकारकडे हल्लेखोरांविरुद्ध “उदाहरण ठरावी अशी कारवाई” करण्याची मागणी केली आहे.

