
माझ्या बालपणापासूनच पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करायला पाहिजे असा अलिखित नियम आमच्या घरी होता. आजही तो आहे. आई-बाबा वाढदिवसाला मला नेहमी पुस्तक भेट द्यायचे कारण त्यांनाही वाचनाची खूप आवड होती माझं वाचन यामुळे वाढत गेलं आणि पुस्तक हाच माझा मित्र बनला. आपल्या भावना चांगल्या प्रकारे मांडायला मला पुस्तकांनीच शिकवलं. वाचाल तर वाचाल" हा मानवी व्यक्तिमत्व विकासासाठी अमूल्य असा संदेश आहे. वाचन करणारी व्यक्ती अधिक प्रगल्भ व वैचारिक कक्षाने रुंदावलेली असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा लाभतात की, ज्यामुळे आयुष्याचं सोनं होवून जातं. हे त्यांच्या सहवासामुळे आणि प्रेरणेमुळे घडतं. त्यांची प्रेरणा आपल्याला उद्युक्त करत असते. चांगल्या सवयी जपण्यासाठी आपलं मन वळवत असते. अशा प्रेरणेतून चांगले संस्कार रुजले जातात. थोर पुरुषांचे चरित्र वाचून आपण प्रेरणा घेणे हा त्याचाच एक मुख्य भाग आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 1जन् दिवस " वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. कलाम यांचे वाचनावरचे अतोनात प्रेम आणि ज्ञान मिळवण्याची त्यांची जिद्द यातूनच या दिवसाची प्रेरणा मिळते. या दिवसाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृती रुजवणे हा आहे.
पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाला वाचनाचे महत्व समजले तर तो स्वतः परिस्थितीवर मात करायला शिकेल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबालासुद्धा संघर्षाशी सामना करायला शिकवेल. एकदा का विचारांची पातळी बदलली की, समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही एवढी मोठी शक्ती वाचनात आहे.
*Reading makes a man perfect* असं फ्रांसिस बेकन या प्रख्यात विचारवंत आणि निबंधकाराने म्हटलं आहे. वाचनाने मनुष्य परिपूर्ण होतो. वाचनाच्या अनुषंगाने बहुश्रुत होतो. त्याच्या ठायी विशाल दृष्टिकोण प्राप्त होतो.
तज्ज्ञांच्या मते, *"पुस्तकं वाचण्यानं मेंदू सतत सक्रिय राहतो. वाचनाच्या सवयीतून एकप्रकारे मेंदूचा व्यायाम होतो. शिवाय स्मरणशक्ती व मेंदूच्या क्षमतेत वाढ होते."* या कारणामुळे सर्वांनीच पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी.
तसेच, एकाग्रता वाढवण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण कामात एकाग्रता साधू शकत नाहीत. ती एकाग्रता पुस्तके वाचल्याने साधू शकते. पुस्तकं वाचल्यानं आपण दररोज नवनवीन गोष्टी शिकत राहतो. यामुळे आपला मेंदू तणावापासून दूर राहण्यास मदत होते.
वाचनाचा महिमा महान लोकांनीही सांगितला आहे. लोकमान्य टिळक म्हणतात की, *"जर मला वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर मी नरकामध्ये देखील आयुष्य व्यतीत करेन."* पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान वाढतो. ज्याचा छंद वाचन करणे असतो असा माणूस कधीच एकटा नसतो. पुस्तके आपले सर्वात चांगले मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान तर देतात पण त्यासोबतच आपले मनोरंजन देखील करतात.
पुस्तके आपल्याला आयुष्याचे धडे देतात. कारण प्रत्येक पुस्तकाचे विषय वेगळे असतात. प्रत्येक लेखक त्याच्या पुस्तकातून आपल्याला आयुष्याचे वेगवेगळे अनुभव देण्याचे काम करत असतो. त्यामुळे जितकी जास्त पुस्तके आपण आयुष्यात वाचतो, तितके आपण विचारांनी प्रगल्भ बनतो. आपल्या डिक्शनरीत नवनवीन शब्दांची भर पडते. त्याचप्रमाणे कोणत्या परिस्थितीत कसे वागावे? याचे देखील आपल्याला त्यातून शिक्षण मिळते. म्हणजेच काय तर पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात. वाचल्याने स्मरणशक्तीवरही चांगला परिणाम होतो. या सवयीमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
*"ज्या घरी नाही पुस्तकाचे कपाट ते घर होईल भुईसपाट"* असे म्हटले जाते. वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी तर पुस्तकांचे वाचन हे मोठ्यानेच करायला हवे. त्यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर पुस्तक वाचणे आवश्यक आहे. आज सोशल मीडियामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून प्रत्येकाने काहीतरी वाचन करावे.
दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे
पुस्तक वाचन आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे आवश्यक आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठराविक वेळ वाचनासाठी ठेवावी. किंवा झोपताना देखील पुस्तक वाचले तर झोप शांत व छान लागते.
पुस्तकांचे जगच विलक्षण आहे. खरा वाचक शांतपणे, निवांतपणे वाचनाचा आनंद घेताना, पुन्हा मागची पाने वाचण्यात गुंग होतो. वाचनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. एखादे पुस्तक, पुस्तकातले पान आयुष्य बदलवते. त्यातले एखादे वाक्य आयुष्याचे धेय ठरवू शकते. एवढी ताकद त्या वाचनात आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता, पंचतंत्र यातून भारतीय जीवनमूल्य प्रतिबिंबित होतात. वाचन ही एक श्वासोच्छ्वासाइतकीच अत्यंत आवश्यक बाब आहे. परीक्षांच्या व अभ्यासक्रमाच्या पलीकडे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक माध्यम म्हणून आपण वाचलेच पाहिजे.
वाचनाशी माणसाची मैत्री असावी कारण मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात.सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानातूनच आखला जातो. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे.
वि.स.खांडेकर,वि.वा.
शिरवाडकरांपासून ते आज पर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंत आणि रविन्द्रनाथ टागोरापासून गुलजारसाहेबांपर्यंत..
“लिहणा-याने लिहीत जावे…
वाचणा-याने वाचीत जावे
कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे..”
इतकं सुंदर आहे हे वाचणं!
वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहेअसले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
वाचनाने विचार आणि वाचा यांत प्रगल्भता येते.
मात्र आज समाजात मोबाईल, इंटरनेटचं प्रस्थ वाढत असताना अनेक लोकांनी पुस्तकं वाचण्याच्या सवयीला तिलांजली दिली आहे. सध्या खूप कमी लोक पुस्तकं वाचतात. जेव्हा मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब आले नव्हते तेव्हा वेळ सत्कारणी घालवण्यासाठी लोकं पुस्तकं वाचायचे. पण आज मात्र लोक या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आहारी गेले आहेत. "विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे" असे अब्दुल कलाम यांचे मत होते. स्वामी विवेकानंद ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणून त्याचे वाचन करीत असत. पुस्तकेच माणसाला समृद्ध करतात. राजमाता जिजाऊंनी बाल शिवाजीला पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्याच्या शौर्याला आकार दिला होता.बाबासाहेब आंबेडकरांना ‘पुस्तक माझा मित्र’ या मंत्राने वाचनातूनच समाजाची विचारधारा बदलून स्वतःच्या कार्याची दिशा गवसली होती. दबलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असल्यास वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. बहिणाबाईंच्या कविता लोकांनी लिहून ठेवल्यामुळे वाचनातूनच त्यांचा जीवानुभव समजला.
वाचनाला वय नसते. पुस्तके आपल्याला अमर्याद ज्ञानाची खोली देतात. जेष्ठ साहित्यिक दासू वैद्य यांच्या ओळी किती सुंदर आहेत पहा..ते म्हणतात,
“पुस्तकं काही सांगू इच्छितात,
तुमच्या सावलीत रांगू इच्छितात,
पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते
पुस्तकात हिरवेगार रान हलते”

शेवटी मी एवढेच म्हणेन, *पुस्तकांचं बोट धरून वाचनाच्या विश्वात प्रवेश केला तर आपल्या जाणिवांचा प्रवास लख्ख झाल्याशिवाय राहणार नाही.*
*ऋचा पत्की लातूर*

