
प्रा. विमल होळंबे -डोळे
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर
14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी सर फ्रेंड रिक बँटिंग व चार्ल्स बेस्ट यांनी इन्सुलिन चा शोध लावला. व सर फ्रेडरिक यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस पण आहे. मधुमेह म्हणजे असा रोग ज्यामध्ये साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते. तर मग आपल्या सगळ्यांना वाटेल की रक्तामध्ये साखर कशाला हवी? याचं साधं सोपं उत्तर म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी त्याची गरज असते. आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोजचा वापर करण्यासाठी इन्सुलिन नावाच्या एका सन प्रेरकाची मदत लागते. हे इन्शुलिन आपल्या शरीरातील स्वादुपिंड नावाच्या ग्रंथी मध्ये तयार होते. ही ग्रंथी जेव्हा इन्सुलिन निर्माण करणे बंद करते किंवा निर्माण झालेले इन्सुलिन जेव्हा शरीरातील पेशी योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही परिणामी मधुमेहासारख्या भयंकर आजाराला मग आपल्याला सामोरे जावे लागते. सर्वसाधारणपणे रक्तात साखरेचे प्रमाण 80 ते 120 mg एवढे असते. यापेक्षा जास्त असेल तर मधुमेहाचा आणि कमी असेल तर हायपोग्लासेमियाचा त्रास होतो. आपल्याला मधुमेह असल्याची शंका केव्हा यायला हवी? पुढीलपैकी लक्षणे मधुमेहाची निदर्शके असू शकतात.
1) जास्त भूक व तहान लागणे
2) लघवीला वारंवार जावे लागणे
3) दिसण्यास (नजर कमजोर)त्रास होणे
4) हिरड्यांना वारंवार जंतुसंसर्ग होणे.
5) जखमा बऱ्या न होणे.
कधी कधी रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत म्हणून आपण आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासण्या द्वारे काळजी घेतली पाहिजे.
. मधुमेहाची जोखीम कोणाला असू शकते.
- प्रमाणाबाहेर वजन, अनुवंशिकता, बैठी जीवनशैली, स्वादुपिंडाचे आजार, जेवणात मेदाचे प्रमाणाबाहेर सेवन, मानसिकतान गरोदरपणात मधुमेहाची हिस्टरी.
मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही तर काय होते?
रक्तातील साखरेची पातळी जेव्हा दीर्घकाळ उच्च राहते तेव्हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची गंभीर हानी होऊ शकते. जसे की मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे अंधुक दिसणे मूत्रपिंडाला अपाय, मज्जातंतूना अपाय व पायांना सतत जखमा होणे, मधुमेहाची निदान लवकर होईल याची व निदान झाल्यावर ते नियंत्रणात राहील याची काळजी घेतली तर वरील गंभीर गुंतागुंत टाळली जाऊ शकते.
मधुमेहावर नियंत्रण:- मधुमेहाची त्रिसूत्री 1.आहार 2.व्यायाम3. औषधे.
मधुमेहावर नियंत्रण म्हणजे दीर्घकाळ साखरेची पातळी सामान्य मर्यादित ठेवणे.
आहार:- आहारात हिरव्या पालेभाज्या, जास्त तंतुमय पदार्थ, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश असावा.
माफक प्रमाणात खाण्याचे पदार्थ : दाणे, डाळी,फळे (कमी गोड) दुधाचे पदार्थ, इत्यादी.
काटेकोरपणे टाळायचे पदार्थ :- साखर, गोड पदार्थ, मद्य,जाम,पेस्ट्री, कुकीज,साखर घातलेले फळांचे रस, आणि हर्बल पेय जेवण घेताना त्याची वारंवारता असावी म्हणजे थोडे थोडे पण जास्त वेळा घ्यावे.
व्यायाम :- मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराप्रमाणेच व्यायामालाही तितकेच महत्त्व आहे व्यायाम करतेवेळी स्नायू ग्लुकोजचा वापर करतात त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम पण मॉडरेट इंटेसिटी चा व्यायाम जसे की जलद गतीने चालणे धावणे सायकलींग आठवड्यातून पाच दिवस दररोज 45 मिनिटे असे करणे गरजेचे आहे.
औषधे:- औषधांची नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करणे. लक्षात ठेवा तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला वेदनेची जाणीव नाही होणार त्यामुळे शरीरात कुठे सहसा पायांना ठेच लागणे व पुन्हा ती जखम बरी न होणे असे सहसा मधुमेहात होत असते त्यामुळे आपण वर्षातून किमान एकदा तरी आपल्या आवश्यक तेवढ्या तपासण्या करून घ्याव्यात अशाने मधुमेहापासून वेळीच दूर राहता येईल.

