एक अद्भुत अनुभव

मंदिर , मठ अशा धार्मिक संस्थानामध्ये वर्षानुवर्षे रुढी, परंपरांचे पालन आणि परंपरा जतन करण्याचे काम केले जाते. परंतु एखाद्या कुटुंबात अशी परंपरा जतन करण्याचे कार्य दुर्मिळच असेल. लातूर येथे अशीच तब्बल २०० वर्षांपासून ची प्रतिमा पुजनाची परंपरा आजही पाळली जात आहे.एखाद्या जादुई कथेचा भाग वाटावा अशीच ही घटना पण हा लातूर जिल्ह्यातील धार्मिक ठेवा म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुळ लोहारा येथील संदीकर कुटूंब अनेक वर्षांपासून लातूर येथे राहतात. तिरुपती बालाजी येथून मनोहराचार्य संदीकर यांनी श्री व्यंकटेश, श्री देवी (लक्ष्मी) भुदेवी (पद्मावती) यांच्या प्रतिमा अगदी शास्ञोक्त पध्दतीने तयार करून आणलेल्या. त्याचप्रमाणे गंडकी नदीच्या उगमाच्या ठिकाणावरून विविध प्रकारचे शाळीग्राम आणले. उत्तराधीमठाच्या पद्धतीप्रमाणे या प्रतिमांची पुजा आजही करण्यात येते. ही पुजा पध्दती म्हणजेच एक दिव्य आहे. पुर्वी वाहत्या पाण्यात स्नान करूनच या प्रतिमांची पुजा केली जायची पण लातूर येथे आल्यानंतर विंधन विहिरींच्या पाण्याने स्नान करुन पुजा केली जाते. दिवाळी पाडवा, गुढी पाडवा, नवराञोत्सव, बालाजीचं पारणे, चंपाषष्ठी उत्सव आणि आषाढी-कार्तिकी एकादशी हे सण आहेत ज्या दिवशी या मागील परंपरा जागृत होतात. पाच ते सहा तासांच्या कालावधीत ही प्रतिमांची पूजा होत असते.

विष्णूपाद प्रतिमेवर भगवान श्री व्यंकटेश त्यांच्या उजव्या हाताला श्रीदेवी (लक्ष्मी) डाव्या हाताला भुदेवी (पद्मावती) आणि समोर कालिया मर्दन रुपातील श्रीकृष्ण आणि वेद व्यास यांच्या प्रतिमा. अगोदर त्यांची पुजा केली जाते.मुळ प्रतिमेची पूजनानंतर विष्णू संनिधान पुजा, नंतर सर्व प्रकारच्या शाळिग्राम पुजनानंतर, देवघरातील श्री लक्ष्मी चा टाक त्याची पुजा नंतर वायुदेव, गरुड, शेष, नंतर वृंदावनाची पुजा, नैवैद्य, आरती वैश्य देव करुन पुजा पुर्ण केली जात असते. त्यानंतर इतर देवतांची पूजा केली जाते, हा सर्व पुजाविधी एका क्रमाने करावयाचा असुन त्यात चुक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.

नैवैद्यासाठी चूल किंवा गॅसचा वापर केला जात नाही तर थेट कोळशांची शेगडी वापरून त्यावरच नैवेद्य बनवला जातो. मनोहराचार्य संदीकर यांच्यानंतर वामनाचार्य यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांची विद्वत्ता एवढी होती की त्या काळी वामनाचार्यांचे लोहारा अशी गावची ओळख सांगितली जात असे. पुढे लातूर येथे स्थलांतरित झाल्यावर जनार्धनाचार्य संदीकर, हणमंताचार्य संदीकर, व्यंकटेशाचार्य संदीकर आणि आज सहाव्या पिढीतील ॲड गुरुराज संदीकर ही परंपरा भक्तीने आणि श्रध्देने पुढे चालवत आहेत.

१२ शाळीग्रामांची पुजा असलेल्या ठिकाणास तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला जातो
ज्या ठिकाणी १२ शाळीग्रामांची पुजा केली जाते ते ठिकाण तिर्थक्षेत्र समजले जाते. संदीकर यांच्या घरांमध्ये त्यापेक्षा अधिक शाळीग्राम आहेत. शाळीग्रामाचे विविध प्रकार सांगितले जातात.

संदीकर यांच्या कडे असलेल्या
शाळीग्राममध्ये वासुदेव, मत्स्य स्वरुपातील , चक्रांकीत आणि हरिहर स्वरुपातील शाळीग्रामांचा समावेश आहे. उत्तराधीमठाचे स्वामी सत्य प्रमोद तीर्थ यांनी संदीकर यांच्या घरी येऊन या प्रतिमां पूजेसाठी विशेष अनुग्रह केलेला आहे.
शासकीय नौकरी सोडून देऊन प्रतिमा पुजनाची जबाबदारी स्वीकारली
कोणत्याही रुढी, परंपरा पाळणे आणि पुढे चालवणे सोपे काम नाही. त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. व्यंकटेशाचार्य संदीकर यांनी या प्रतिमा पुजनाची जबाबदारी स्विकारण्यासाठी कायम असलेली चक्क शासकीय नौकरी सोडून दिली.
ॲड. गुरुराज संदीकर यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. त्यांनी सांगितले की, या मुळे प्रतिमांची पूजा करताना थोडाही थकवा जाणवत नाही. जेव्हा पूजा सुरू होते, तेव्हा मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि नैवेद्य आरती नंतर पुजा पुर्ण झाली की नंतरचे भाव यातील फरक अगदी स्पष्टपणे जाणवतो. अगदी सुहास्य मुद्रेतील भगवान श्री व्यंकटेशाची मुर्ती पाहिली की मन प्रसन्न होते. ते सर्व भाव आपण छायाचित्रांच्या, व्हिडिओच्या माध्यमातून जतन करून ठेवले आहेत असे ही त्यांनी सांगितले. ते पाहण्याचे भाग्य ही अनेकांना लाभलेले आहे.


