
लातूर, दि. 26 नोव्हेंबर — देशाच्या लोकशाहीची आधारभूत रचना असलेल्या भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आज संविधान सन्मान रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय भवन येथून हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ झाला आणि रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उत्साहात समारोपास पोहोचली.
या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त अविनाशजी देवशटवार, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, समाजकल्याण अधिकारी नाईकवाडी, केंद्र व जिल्हा माहिती अधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासोबत विविध शाळांमधील विद्यार्थी–विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती ही रॅलीचे खास वैशिष्ट्य ठरली.
रॅलीदरम्यान भारतीय संविधानाची गरिमा, त्याची उद्दिष्टे, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची महत्त्वपूर्ण माहिती फलक, घोषवाक्ये व जनजागृती संदेशांच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने संविधानाच्या मूल्यांची जपणूक, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलतत्त्वांची जाणीव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, हा मुख्य हेतू यावेळी स्पष्टपणे अधोरेखित झाला.
संविधानाचा स्वीकार, पालन आणि संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे अधिकारी वर्गाने सांगताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेल्या संविधानामुळेच देशाची लोकशाही अधिक सक्षम झाली असल्यावर भर देण्यात आला.
संविधान दिनानिमित्त आयोजित ही रॅली ज्ञान, जागरूकता आणि राष्ट्रीय बांधिलकी यांचे दर्शन घडवणारी ठरली.

