अभय मिरजकर

लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल असल्याशिवाय मुले खाणे, पिणे सुध्दा करत नसल्याचे सार्वत्रिक दिसून येत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लातूर शहरातील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र या शाळेने थेट अभिनव अशी पुस्तकं घर ही संकल्पना राबवली आहे.
महाराष्ट्रात वाचनालय माहिती नाही असे कोणी नसावे, शाळा, महाविद्यालयात ग्रंथालय आहेत पण त्याचा वापर फारसा कोणी करत नाही. केवळ संशोधनात्मक कार्य, अभ्यास, लेखन यासाठी त्याचा प्रकर्षाने वापर केला जातो. सध्या वाचन संस्कृती जवळजवळ नाहिशी होत आलेली आहे. मोबाईल आणि टि.व्ही.चा अतिरेकी वापर घराघरात सुरू आहे. लहान मुलं रडत असेल तर तो रडू नये यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मुलाला खाऊ घालताना असो किंवा जेऊ घालताना असो मोबाईल शिवाय तो खाणंपिणं करत नाही.

मोबाईलचा अतिरेकी वापर मुले करत आहेत त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून बालशिक्षणातील प्रयोगशाळा म्हणून ओळख असलेल्या ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात हा पुस्तक घर चा अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मुलांचे शिकणे सहजतेने व आनंददायी व्हावे हा त्यामागचा उद्देश पण आहेच.

“बालदिन ” देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. बालदिनाचे औचित्य साधून मुलांसाठी पुस्तक घर सुरू करण्यात आले . प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे ,संचालिका व मुख्याध्यापिका सविता नरहरे यांच्या संकल्पनेतील ” पुस्तक घर ” चे उद्घाटन डॉ. सुरेखा काळे यांच्या हस्ते करण्यात आले . इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गात साधारण तीनशे विद्यार्थी आहेत. त्यामुळे या पुस्तकांच्या घरात या वयोगटातील मुलांना आवश्यक असणारी भुयारी ५०० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. मुलांनी पुस्तक घरात जाऊन स्वतः पुस्तके पहावीत , आवडेल ते निवडावे , पाहिजे तिथे बसून वाचावे , पुस्तकांचे खेळ खेळावेत , ताईंसोबत पुस्तकावर आधारित कृती कराव्यात यासाठी हे नियोजन केले आहे. पुस्तक घराचा प्रारंभ केल्यानंतर मुले स्वतः तीथेच जात आहेत, वाचनाचा, पुस्तकातील चिञे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. “वाचन संस्कार हा लहान वयोगटापासून मिळाला तर ही मुले पुढेही छान वाचतील. मोबाईल, टीव्ही पासून दूर राहतील.” या प्रयोगाचे यश समजण्यासाठी थोडा कालावधी लागेल. परंतु मुलांवर सक्ती न करता ते स्वतः प्रेरित होऊन वाचन संस्कृती स्विकारतील यासाठी हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे.


