अभय मिरजकर ……

आपल्या अवतीभवती कष्टाने यश मिळवलेल्या व्यक्ती असतात परंतु त्या प्रसिद्धीपासून दूर असतात. अहमदपूर तालुक्यातील गादेवाडी या छोट्या खेड्यातील आयतलवाड सखुबाई केरबा यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असा आहे.
गरीब कुटुंबांमध्ये जन्मलेल्या सखुबाई यांच्या कुटुंबात आई,वडील. तीन भाऊ आणि तीन बहिणी एवढे सदस्य. आईचे शिक्षण अत्यल्प तर वडीलांचे शिक्षण पण थोडेसे झालेले. सखुबाई यांचा विवाह इयत्ता नववी मध्ये असताना वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी झालेला. लग्नानंतर शिक्षण बंद झालेले. शिक्षणाची आवड असताना ते घेता आले नाही याची खंत कायम वाटत असे. सासरची परिस्थिती पण साधारणच होती. नवऱ्याचे शिक्षण पण नववी पर्यंत झालेले. शेती आणि मजुरी करून उपजीविका भागवली जायची.

सखुबाई यांनी आयटीआय शिलाई मशीन चा कोर्स केला होता सर्व प्रकारची कपडे शिवायला शिकले. शिलाई मशीन हे कमाईचे पहिले साधन ठरले होते . तीन मुले झाली , मुलं मोठी होऊ लागली. शाळेचा खर्च शिलाई मशीन आणि मजुरी मधून भागत नव्हता. काहीतरी जोडधंदा म्हणून दुसरा व्यवसाय करायचं ठरवलं योगायोगाने बचत गटामध्ये जाण्याची संधी मिळाली.
बचत गटात अध्यक्ष म्हणून खूप फायदा झाला. गटामुळे आर्थिक व्यवहार समजू लागले, बँकेचे व्यवहार समजू लागले. बचत कशी करायची हे समजू लागलं . गटामधून वीस हजार रुपये अंतर्गत कर्ज घेतले , दोन मशीन खरेदी केल्या एक पिको फॉल ची मशीन आणि एक साधी मशीन आणि मुलींचे शिलाई मशीनचे शिवण क्लास घ्यायला सुरुवात केली. बचत गटाच्या उमेद अभियानामध्ये सीआर पी म्हणून काम सुरू केले. पुढचं शिक्षण घेण्याचे ठरवले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून दहावी, बारावी, बीए ग्रॅज्युएशन केलं . एम एस सी आय टी चा कोर्स केला . एम ए ला ऍडमिशन घेतलं आणि शिक्षण घेण्याचे अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण झाले.

आरसीटीला ज्युट बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. सर्व प्रकारच्या बॅगा तयार करून स्वतःचं प्रॉडक्ट तयार झाले. त्या माध्यमातून महालक्ष्मी सरस मुंबई येथे स्टॉल लावला. बारा दिवसांचा स्टॉल मधून 85 हजार रुपयांचं नफा भेटला. नंतर बॅगांचा व्यवसाय सुरू केला. लातूरमध्ये तीन दिवसाचा स्टॉल लावला तीन दिवसात पंधरा हजार रुपयांची विक्री झाली. थोडीफार बचत जमा झाली बँकेचे थोडे कर्ज घेऊन परकर शिवण्याच्या तीन मशिनी खरेदी केल्या स्वतः कपडा आणून कट करून परकर तयार करून दुकानांमध्ये विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तीन महिलांना काम पण देता आले. तालुक्यामधून लखपती दीदी म्हणून सखुबाई यांचे नाव घोषित केले . जळगाव येथे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले. कुटुंबातील सर्वांचा पाठींबा असल्याने यशस्वी होता आले अशी कृतज्ञतेची भावना सखुबाई व्यक्त करतात.

