
लातूर :
शास्त्रीय संगीतातील गुरू–शिष्य परंपरेचा सन्मान राखत गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी व गुरुमाई शंकुतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘सुरताल संगीत सभा’ रविवारी (दि. ११ जानेवारी २०२६) सायंकाळी ६.३० वाजता कै. प्रयागबाई पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात, अंबाजोगाई रोड, लातूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या संगीत सभेत शास्त्रीय वादनातील नामवंत तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद (पुणे) यांनी सादर केलेल्या तबला सोलोने रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या वादनातील लयकारी, तंत्रशुद्धता आणि भावपूर्ण सादरीकरणाने सभागृहात तालाचा दरवळ भरून राहिला. पं. बाबुराव बोरगावकर (लातूर) यांनी हार्मोनियमवर दिलेली समर्थ आणि सुसंवादी साथ विशेष उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमित्रा शांताराम चिगरी उपस्थित होत्या. दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालमार्तंड प्रकाश बोरगावकर व बालाजी अप्पा पिंपळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी व गुरुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला. चिगरी गुरुजींचे शिष्य सोनू डगवाले यांनी गुरुवर्य गुरुजींच्या शास्त्रीय संगीतातील योगदानाचा सविस्तर आढावा घेत भावस्पर्शी प्रास्ताविक सादर केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अभिजीत देशमुख यांनी गुरू–शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेत लातूरचे स्थान विशेष असून चिगरी दाम्पत्यांनी घडवलेले सांगीतिक वलय हे अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शास्त्रीय संगीतातील परंपरा जपत गुरू–शिष्य परंपरेचा वारसा पुढे नेणारी ही सुरताल संगीत सभा रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली. दर्जेदार सादरीकरण, शिस्तबद्ध आयोजन आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पाटील यांनी केले तर आभार संजय सुवर्णकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनू डगवाले, डॉ. संदीप जगदाळे, प्रमोद भोयरेकर, अमर कडतने, विशाल जाधव, मीनाक्षी कोळी, संजय सुवर्णकार, वैभव जाधव, व्यंकट काळे, शिवाजी कंदगुळे, कृष्णा विधाते, राहुल कांबळे, सत्यवान जोगदंड, दीपक शिंदे, महेश काकनाळे, गौरव साठे व शिरीष देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सुरेल सांस्कृतिक सोहळ्यासाठी लातूरकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

