
लातूर : दिनांक 26 मार्च 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त देशभर सुरू असलेल्या 100-दिवसीय काउंटडाउन मालिकेच्या अनुषंगाने 87 व्या दिवशी लातूर येथील एमआयडीसी भागातील जेएसपीएम कॅम्पसमध्ये भव्य ‘योग महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद, जेएसपीएम शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर व सप्तरश्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालय व मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. या महोत्सवात सुमारे 500 ते 600 विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक मा.अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “योग हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, तो वर्षाचे 365 दिवस जगण्याची जीवनपद्धती आहे. प्रत्येकाने योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करणे अत्यावश्यक आहे.”

महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ.किरण सगरे-पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येकाने आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगाचे विविध प्रकार अंगीकारले पाहिजेत. यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यासह सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधता येतो.”

या प्रसंगी रुद्रा स्पोर्ट अकॅडमीच्या महिला गटाने पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत योगासनांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच डॉ सृष्टी पंचाक्षरी-सगरे पाटील यांनी ‘कॉमन योग प्रोटोकॉल’नुसार उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेतला.

या कार्यक्रमाला प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, गणेश कदम, बाळाराम पिचारे, उपप्राचार्य मनोज गायकवाड ॲड.रामेश्वर सगरे पाटील, डॉ.सृष्टी पंचाक्षरी-सगरे पाटील, सौ.आशा झुंजे पाटील भुसनुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अब्दुल गालिब शेख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेएसपीएम संस्थेचे शिक्षक, स्वयंसेवक तसेच पतंजली युवा भारत व आय.एन.ओ.च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
