*शंभर टक्के वीजबील वसुलीसह ग्राहकाभिमूख सेवेला देणार प्राधान्य*

लातूर, प्रतिनिधी : महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार श्री अरविंद बुलबुले यांनी काल (दि.१७) स्विकारला. यापुर्वी रास्तापेठ मंडल कार्यालय, पुणे येथे अधीक्षक अभियंतापदी कार्यरत होते.
श्री. बुलबुले हे मराठवाड्याचे सुपूत्र असून १९९९ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात सहाय्यक अभियंता म्हणून अहमदनगरच्या ग्रामीण उपविभाग (अहिल्यानगर) येथे रुजू झाले होते. महावितरणमधील २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच अक्षीक्षक अभियंता अशा विविध पदांवर अहमदनगर, हिंगोली, परभणी, सांघिक कार्यालय मुंबई, लोड डिस्पॅच सेंटर कळवा, ठाणे मंडल व रास्तापेठ मंडल पुणे या ठिकाणी प्रभावशाली व उल्लेखनीय काम केलेले आहे. नुकतीच त्यांची मुख्यअभियंतापदी पदोन्नती होऊन लातूर परिमंडलात नियुक्ती झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील क्षेत्रीय अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. मनमिळावू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी विकलेल्या विजेचे संपुर्ण वीजबील दरमहा वसुल झाले पाहिजे. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के कार्यक्षमतेने काम करायला हवे. एक टीम म्हणून काम करत असताना कुटूंब प्रमुख या नात्याने मी तुम्हाला कुठल्याही अडचणी येवू देणार नाही याची खात्री बाळगुन सुरळीत वीजपुरवठा व ग्राहकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, असे श्री. अरविंद बुलबुले म्हणाले. त्याचबरोबर सांघिक कार्यालयाने नेमून दिलेल्या विहीत वेळेतच आपणावर सोपवलेली कामे पुर्ण करावीत. वीजग्राहकांनीही आपले वीजबील नियमीत व वेळेवर भरावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले

