*५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदवला सहभाग*

लातूर, प्रतिनिधी: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने महावितरणच्या संयुक्त सिमतीच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जोपासत ५२ बॅगचे रक्तदान करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सुपूर्द केले.
स्वराज्य म्हणजे गोरगरिबांच्या, उपेक्षितांच्या , शोषितांच्या उद्धारासाठी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य आणि हाच संदेश घेऊन शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना द्यावी या हेतूने काल (दि.१७ ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा कार्यभार स्विकारताच श्री अरविंद बुलबुले यांच्या हस्ते व अधीक्षक अभियंता श्री मदन सांगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत या रक्तदान शिबीराची सुरवात करण्यात आली. सदर शिबिरास महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. उत्सफुर्तपणे शिबिरामध्ये ५२ बॅगचे रक्तदान झाले. या रक्तदान शिबिरासाठी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच याकामी विलासराव देशमूख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या डॉक्टर्स व तज्ञ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

