केवळ छंदातून ३२ हजार पेक्षा अधिक गाणे गाणारे हरहुन्नरी कलाकार


समाजात असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या पासून प्रेरणा घेता येऊ शकते. परंतू सध्याच्या काळात काय प्रेरणा घ्यावी हेच अनेकांना समजत नाही. प्रेरणादायी काम असणारे आपल्या अवतीभवती असतात पण आपण सेलिब्रिटींच्या पाठीमागे धावत सुटतो. लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बल्लाळनाथ येथील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुनील रमाकांतराव राजहंस यांनी आपल्या कामाने पुढच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. तब्बल दोन वेळा राष्ट्रपती पदक त्यांनी मिळवले आहे. त्याचप्रमाणे संगीताचे कोणतेही शिक्षण न घेता केवळ छंदातून त्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये तर गाणे म्हटलेच पण स्टारमेकर च्या माध्यमातून तब्बल ३२ हजार पेक्षा अधिक गाणे त्यांनी म्हटलेले आहेत.
सुनील राजहंस यांनी आय.टी.आयचा टर्नर हा ३ वर्षांचा डिप्लोमा केला होता. वडील चांगले वादक, गायक आणि नाट्य कलावंत होते. त्यांच्याकडे पाहून सुनील यांनी ही गाणे म्हणण्याचा छंद जोपासला.विशेष म्हणजे संगिताचे कोणतेही शिक्षण त्यांनी घेतले नाही. लातूर येथील ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी गायन आणि वादनाचे काम ३ वर्षे केले. त्यांचे आजोबा निजामाच्या पोलीस दलात होते, ती प्रेरणा घेऊनच घरचा विरोध असतानाही त्यांनी सिमा सुरक्षा दलात काॅन्स्टेबल म्हणून १९८४ मध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. ग्वाल्हेर येथील टेकनपूर मध्ये नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पुर्ण केले.” बेस्ट ट्रेनी इन बॅच ” म्हणून निवड झाली व गोल्ड मेडल मिळाले.
प्रशिक्षण अवघड असते त्यामुळे अनेक जण ते पुर्ण न करता पळून येतात. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर पहिली पोस्टींग मिळाली ती जम्मू बटालियन मध्ये. २ वर्ष तिथे काम केल्यानंतर पुन्हा ग्वाल्हेर येथे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन म्हणून काम केले.परत २ वर्षे श्रीनगर बाॅर्डरला काम केले. नंतर पंजाब मध्ये अबूहर बाॅर्डरला साडेतीन वर्षे काम केले. जालंधर हेडक्वार्टर येथे ४ वर्षे काम केले. जम्मू येथील वर्कशॉपमध्ये काम केले.
काॅन्स्टेबल म्हणून प्रथम नियुक्ती होती,नंतर परिक्षा देऊन टेक्निशियन, हवालदार, सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर असे स्पेशल प्रमोशन मिळाले. मिझोरम, लुंगलेन, आयझोन अशा खडतर ठिकाणी काम केले. मिझोरम मध्ये कार्यरत असताना नशेच्या गोळ्यांची तस्करी होत असल्याची टिप मिळाली होती.म्यानमार मधून त्या आलेल्या होत्या. तब्बल ९८ लाखांचे ड्रग पकडण्यात आले. या कामगिरीबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. बांगलादेशी घुसखोर नागरिक पकडण्याचेही काम केले.
नौकरी करत असताना सांस्कृतीक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे गाण्याच्या छंदही जोपासता आला. मॅरेथॉन मध्ये रेसर म्हणून सहभागी होत असे. स्टार मेकर च्या माध्यमातून तब्बल ३२ हजार पेक्षा अधिक गाणे त्यांनी म्हटलेले आहेत.


लातूर जिल्ह्यातील युवकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये सैन्य दलात भरती होण्याची मानसिकता नाही.चिंचोली बल्लाळनाथ गावातील मी पहिलाच व्यक्ती सिमा सुरक्षा दलात भरती झालेला. नंतर काही जण सैन्य दलात भरती झाले. सैन्य दलात नौकरी करणे कठीण असते. दररोज नवीन आव्हाने उभी असतात. शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असते. प्रत्येक कामाची वेळ ठरलेली असते. १२ राज्यात काम करता आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावेळी एक राष्ट्रपती पदक मिळाले . तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या स्वाक्षरी मधील प्रमाणपत्र आणि पदकही मिळाले. जीवनातील ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त झाल्यानंतर आता गाण्याचा छंद जोपासत असल्याचेही त्यांनी सांगितले. कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या सहकार्य आणि पाठबळामुळेच ४१ वर्षे देशसेवा करता आली हे अभिमानास्पद वाटते असे ही सुनील राजहंस यांनी सांगितले.
अभय मिरजकर, लातूर
९९२३००१८२४.

