महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीने विविध उपक्रम राबवून साजरी केली शिवजयंती

लातूर प्रतिनिधी : महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठया उत्सहात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवव्याख्याते प्रा.अरुण धायगुडे पाटील यांचं ‘ रयतेचे राजे छत्रपती शिवराय ‘ या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम रयतेच्या मनात स्वाभिमान पेरणारे राजे होते, शिवाजी या नावातच नवोत्थान, नवक्रांती घडवणारा धगधगता विचार आहे, म्हणूनच ३९५ वर्षानंतरही शिवाजी महाराजांचा विचार आपल्यामध्ये सामावलेला आहे असे मनोगत प्रा.धायगुडे पाटील यांनी व्यक्त केले. तत्पुर्वी परिमंडळ आणि मंडळ कार्यालयात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते शासकीय इतमामात महाराष्ट्र गिताच्या सुरात शिवजयंती साजरी करण्यात आली.

विद्युतभवन येथे संपन्न झालेल्या शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी उपस्थित राहिलेले मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता बी, जी. शेंडगे, गणेश सामसे, संजय पोवार, गणेश पाचपोहे, सहाय्यक महाव्यवस्थापक चेतन वाघ, वरिष्ठ व्यवस्थापक जालींदर मंगळवेढेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सहाय्यक अभियंता राहुल गाडे यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झालेल्या शिवजयंती उत्सवात प्रा. धायगुडे पाटील पुढे म्हणाले की, स्वराज्यापुर्वी मराठयांची अवस्था ही झुंजीसाठी पाळलेल्या कोंबडयासारखी होती. सुभेदारी, वतनदारी अशा फेकलेल्या तुकडयांवर समाधान मानून आपण आपल्याच माणसांशी लढतो आहोत, वाहणारे रक्त हे आपल्याच कोणाचेतरी आहे याचे भान विसरून आदीलशाही, निजामशाहीसाठी स्वाभिमान दावणीला बांधून निरर्थक जीवन जगणाऱ्या मराठी माणसांच्या मना-मनात स्वराज्याचे स्वप्न धगधगत ठेवून स्वाभिमान पेरण्याचे जागवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमे मध्ये अठरापगड जातींना सोबत घेवून मावळा निर्माण केला. अफजल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे अशा घटनांवर आता बोलण्यात अर्थ नाही, आता अशा घटनांमागील शिवरायांचा विचार काय होता यावर विचारमंथन व्हायला हवे असाही संदेश प्रा.धायगुडेंनी दिला. आजकाल महामानवांच्या साजऱ्या होणाऱ्या जयंत्यांचे स्तोम पाहता भावी पिढीला शिवाजी महाराज सांगतांना आत्मपरिक्षण करायला लावणारे व महाराजांचे नाव घेण्यासाठी आपल्याअंगी काय गुण असावेत याबाबतचे विचार सांगतांना जिजाऊंनी केलेले संस्कारच एक महान राजा होण्यासाठी कामी आल्याचे सांगीतले. तसेच आज इतिहासाची चिकित्सा करण्याची गरज असल्याचे म्हणाले. महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखला देत स्रियांविषयीचे विचार, शेतकऱ्याविषयीची तळमळ, एकूणच रयतेचे कल्याण याबाबत आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या सर्वगुणसंपन्न अशा या कलयाणकारी राजाचे नाव घ्यायचे असेल तर त्यांच्यासारखे गुण अंगी बाळगावे असे विचारही प्रा. धायगुडे पाटलांनी व्यक्त केले.
जयंती उत्सवाचे सुत्र संचालन प्रशांत जानराव यांनी केले तर प्रास्ताविक अभियंता राहूल गाडे यांनी केले. तसेच आभार अभियंता श्रीनिवास शिंदे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सामाजिक कर्तव्य म्हणून आणि समाजाचे ऋणाची परतफेड करावी या भावनेतून दरवर्षी प्रमाणे शिवजन्मोत्सव समितीचे प्रमूख अभियंता राहूल गाडे यांच्या संकल्पनेतून ५२ रक्तबॅगाचे संकलन काण्यात आले तसेच कानाच्या शस्त्रक्रियेसाठी एका गरजू शालेय मुलास ५१ हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. त्याचबरोबर बालशिवव्याख्याता या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या पाल्यांना भेटवस्तू देऊन प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

