- डॉ. संदीपान जगदाळे
दयानंद कला महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर दि. १९ “तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन संकट आली तरी मागे फिरायचं नाही, अडचणी आल्या म्हणून वाट बदलायची नाही, थांबायचं नाही. लढत रहायचं. ध्येयाचा पाठलाग करत राहायचं. अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या माणसांनी सूर्य निर्माण करण्याची ताकद निर्माण करायची.” असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता लेझीम, झांजपथक व ढोल ताशाच्या जयघोषात झाली.
डॉ. संदिपान जगदाळे पुढे म्हणाले की, सतराव्या शतकाचा प्रारंभ होताच पाच सुलतानी शाह्या महाराष्ट्राच्या डोक्यावर नाचत होत्या. अशा कठीण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक संकटांचा सामना केला. अफजल खान महाराष्ट्रवर चालून आला. त्याच वेळी सईबाईंचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूचे दुःख अंतर्यामी असताना स्वराज्याची तारणाची ओढ त्यांच्या मनात होती. लाल महालात शाहिस्तेखान घुसला परंतु जीवाची पर्वा न करता त्याची बोटे छाटली. साडेतीन लाखाची फौज घेऊन मिर्झा जयसिंग राज्यावर चालून आला. त्यावेळेस पुरंधर किल्याच्या माचीवर होत असलेला रयतेचा छळ व खुलेआम कत्तली पाहवेनाशा झाल्यामुळे पुरंदरासह २३ किल्ले द्यावे लागले. अशा स्थितीत राजांनी सामर्थ्याने तोंड दिले. कठीण परिस्थितीतही मनाचा समतोल कसा साधावा हे महाराजांचे चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. रयतेचे राज्य यावे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांनी राबविलेल्या योजना लोकहिताच्या होत्या. केवळ शिवजयंती दिवशी महाराजांचे पूजन न करता ३६५ दिवस त्याचे विचार अंगिकरावेत व त्यातून स्फुर्ती घ्यावी “

