
जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार असतोच. परंतु, आपल्या अवतीभवती असे काही प्रेरणादायी व्यक्ती असतात ज्यांच्याकडे पाहून काही तरी करण्याची उर्मी निर्माण होते. लातूरच्या नाट्य चळवळीतील एक अवलिया म्हणजे भारत थोरात हे पण एक असेच व्यक्तीमत्व. ज्यांच्या प्रवासाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या बद्दलचा आदर वाढतो.
९ ऑक्टोबर १९४६ मध्ये जन्मलेल्या भारत श्रीपती थोरात यांच्या आयुष्याचा प्रवास थक्क करणारा आहे. पूर्वी नागपंचमी निमित्ताने कौल खेळला जात होता. त्यामध्ये विविध सोंग तयार केले जायचे. सोंग तयार करताना जे उपलब्ध साहित्य असेल ते रंगरंगोटीसाठी वापरले जायचे. इयत्ता आठवी, नववी चार तो काळ होता. सोंग रंगवताना पाहून त्याची आवड निर्माण झाली आणि रंगरंगोटी करण्याचे काम शिकले. त्यामधून नाटकाची आवड निर्माण झाली. अजब कारस्थान नावाच्या एकांकिकेत दवंडीवाल्यांचे काम केले. शालेयस्तरावरील नाट्य एकांकिकेत काम केले. दहावी नंतर रेल्वे मध्ये इलेक्ट्रिशीयन म्हणून दोन वर्षे काम केले.
रेल्वे विभागाच्या नाटकांमध्ये प्रकाश योजनेचे काम त्यांच्याकडे सोपविलेले. सोलापूर केंद्रातील नाटकांमध्ये सहभाग घेता आला. बरेच काही शिकता आले. त्यानंतर तब्बल आठ वर्षे शहरात दैनिक वाटपाचे काम केले. हे करत असताना डोक्यातील नाटक काही जात नव्हते. नाटकाचे कॉन्ट्रॅक्टरकडे खुर्चीवर नंबर टाकण्याचे काम केले. त्यामुळे फुकटात नाटक पाहण्याची संधी मिळाली. नाटकातील कलावंतांचे मेकअप कसे केले जातात ते पाहता आले. नवयुग नाट्य मंडळात पडदे रंगवण्याचे काम केले. नैपथ्याचे बक्षीस मिळाले.

१९७० मध्ये मुंबई येथे नाट्य प्रशिक्षण घेण्यासाठी जयंत दिवाण, राजा काटे यांनी पाठवले. त्यासाठी लागणारा खर्चाचा भारही त्यांनी उचलला. त्या ठिकाणी आपण बँक स्टेज शिकण्यासाठी आलो असे सांगितले. नाट्य प्रक्षिक्षण शिबिराच्या संचालिका विजया मेहता यांनी नैपथ्याचे, प्रकाश योजनेची, रंगभुषेचे ज्ञान मिळवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. नाना जोगळेकर यांनी रंगभुषेचे प्राथमिक ज्ञानासह सर्व प्रात्यक्षिक करून घेतले. रविंद्र नाट्यमंदिरात प्रकाशयोजना, नैपथ्य आणि रंगभुषा शिकण्यासाठी पाठवले जायचे. त्यानंतर स्पर्धेच्या नाटकांना सुरुवात झाली.
नाटकातील नैपथ्याचे, रंगभुषेचे, प्रकाश योजनेचे असे १४ राज्यस्तरीय बक्षिसे आजपर्यंत मिळवली. मुंबई येथे ७ महिने काम केले. दिवसाला २५ ते ३० रुपये मिळायचे, सह कलाकारांच्या मेकअपची कामे सोपवली जायची. वेषभुषेचे विविध प्रकार शिकता आले. लातूर येथील राजस्थान विद्यालयात क्राफ्ट शिक्षक म्हणून काम केले. तब्बल २५ वर्षे काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ती नाटकांचा छंद सोडला नाही. शाळेतील स्नेहसंमेलनात एकांकिकेची सर्व जबाबदारी पार पाडली.

नाटकातील पात्रांसाठी लागणारी वेशभुषा स्वतः तयार करायची. मुंबईत एका नाटकासाठी चाबुक हवे होते. ते मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागेल. भाड्याने चाबुक घेतला त्यासाठी शंभर रुपये खर्च झाला. त्यामधून वेशभूषेचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. छंदातून सुरू झालेल्या कामातून सेवानिवृत्त झाल्यानंतर व्यवसाय उभा राहिला. आजही वयाच्या ७९ व्या वर्षी जोमाने भारत थोरात काम करतात. आजपर्यंत १०० पेक्षा अधिक नाटकांमध्ये रंगभुषेचे काम त्यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात रंगभुषाकार आणि विविध प्रकारची वेशभूषा पुरवणारे व्यक्ती म्हणून भारत थोरात यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जेष्ठ रंगकर्मी म्हणून १०० व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाट्य महोत्सवात त्यांचा सत्कारही करण्यात आला. शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्यप्रसिध्द शिबिरामध्ये मेकअप शिकवण्यासाठी ते सहभागी होत असतात.
अभय मिरजकर, लातूर
९९२३००१८२४

