
लातूर: जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंड गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असून, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
बास्केटबॉलचे खेळाडू वारंवार जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे मागणी करत आहेत, मात्र लालफितीच्या कारभारामुळे हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. खांब उभे असले तरी मैदान वापरण्याजोगे नाही, यामुळे नव्या खेळाडूंच्या तयारीला अडथळा निर्माण होत आहे.
गुत्तेदारांच्या मर्जीनुसार चालणारा कारभार?
क्रीडा कार्यालयातील ठराविक गुत्तेदारांच्या मर्जीनुसार कामे होत असल्याचा आरोप आता जोर धरत आहे. या परिस्थितीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री याकडे लक्ष कधी देणार?
लातूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडू जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडून लक्ष देण्याची अपेक्षा करत आहेत. खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दाव्यांनंतरही बास्केटबॉल ग्राउंडसारखी मूलभूत सुविधा वर्षभर रखडली आहे, ही बाब गंभीर आहे.
क्रीडा प्रशासनाकडून ठोस निर्णय अपेक्षित
लातूर जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याची क्षमता असूनही, स्थानिक पातळीवर क्रीडा सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष हे चिंतेचे कारण आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
➡ लातूरच्या क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना प्रशासनाकडून ठोस पावले आणि लवकरात लवकर बास्केटबॉल मैदानाच्या दुरुस्तीची अपेक्षा आहे!

