इलेक्ट्रिक बसमध्ये नियमानुसार असलेली सवलत देण्यास नकार
लातूर दि. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी.बस प्रवासामध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात. परंतु एस.टी.महामंडळाच्या सोलापूर आगाराच्या अधिकारी आणि वाचकांनी प्रवाशांना उद्दामपणा दाखवत प्रवासी सवलत नाकारण्याचे काम सुरू केले आहे. अपंग, अधिस्वीकृती पञकारांनाही सवलत नाही असे सांगत पुर्ण तिकीट काढण्यासाठी भाग पाडले जात आहे. इतर आगाराच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सवलत दिली जात आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी.बस प्रवासामध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. अपंग, अधिस्वीकृतीधारक पञकार, विविध पुरस्कार प्राप्त खेळाडू, आजी, माजी आमदार, आता नव्याने महिला, जेष्ठ नागरिक यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. या सवलती मध्ये काही शंभर टक्के सवलत आहे तर काहींना 50 टक्के, 75 टक्के सवलत आहे.
सध्या एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिलेला आहे. राज्यातील काही आगारांमध्ये इलेक्ट्रिक बस मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यात बीड आणि सोलापूर आगाराच्या इलेक्ट्रिक बस चालवल्या जात आहेत. सोलापूर आगाराच्या इलेक्ट्रिक बसमध्ये नियमानुसार असलेली सवलत जाणिवपूर्वक दिली जात नाही. अपंग आणि अधिस्वीकृतीधारक पञकार यांना सवलत नाकारली जाते आहे.
या संदर्भात आज लातूर येथील विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्या कडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी तातडीने सोलापूर आगाराच्या नियंञकाशी भ्रमणध्वनी वरुन बोलून तातडीने सर्व सवलती दिल्या जाव्यात अशी सुचना केली.

