
नळाद्वारे पिवळ्या पाण्याचा पुरवठा सुरुच
शहर महानगरपालिका लातूर शहरात जे पाणी वितरण करत आहे ते पाणी पिवळे आहे. प्रारंभी नळ पाईप लाईन फुटली आहे असे ज्या भागात असे पाणी आले तेथील नागरिकांना वाटले . पण सर्व भागात असेच पाणी येत आहे. किती दिवस पिवळ्या पाण्याची शिक्षा लातूरकर भोगणार आहेत हे देव नाही तर फक्त महापालिका सांगू शकते

लातूर शहर आणि पाणी समस्या हे समीकरण काही सुटत नाही. दर दोन वर्षांनी पडणारा दुष्काळ लातूरकरांना तसा सवयीचा झाला आहे. धनेगाव धरणात पाणीसाठा भरपूर प्रमाणात झाला म्हणून लातूरकर आनंदात होते. या धरणातून पाणी अधिक असल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा सध्या केला जात आहे. मात्र लातूर शहरात पाच दिवसानंतर एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. धरणात पाणीसाठा असताना किमान एक दिवस आड पाणीपुरवठा अपेक्षित होता मात्र हे झाले नाही.
शहरांमध्ये मागील काही दिवसापासून सर्वत्र पिवळे धमक पाणी नळाद्वारे येत आहे. प्रारंभिक नागरिकांना वाटले की एखादी पाईपलाईन फुटली असेल आणि आपल्या भागात पिवळे पाणी आले आहे म्हणून काही जणांनी तक्रारी पण केल्या. परंतु शहरातील सर्वच भागात असाच पाणीपुरवठा सुरू राहिला आहे.
महापालिकेच्या वतीने हे पाणी पिण्यायोग असल्याचा दावा केला जात असला तरी नागरिक मात्र हे पाणी पिण्यासाठी घाबरत आहेत. या पाण्याचा वास येत असून महापालिकेने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

