
लातूर, दि.०७, येथील स्वामी विवेकानंद चौक ते सिद्धेश्वर चौक या सरकारी सार्वजनिक रस्त्यामध्ये, कांही लोकांनी केलेले ते बेकायदा अतिक्रमण मान्य करूनही ते न काढता, मा. जिल्हाधिका-यांच्या आदेशा सह स्वतःच्याच लेखी आश्वासनासही कचराकुंडी दाखविणारे, मनपा आयुक्त हे प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही करण्यास कचरतातच कसे ? असा जाहीर उद्वीग्न प्रश्न उपस्थित करून, या मार्ग मुक्तीसाठी ७ मार्च पासून अन्याग्रस्त कार्यकर्त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयावर, पुनःश्च आपले बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
या बहुचर्चित अतिक्रमणाची संक्षिप्त माहिती अशी की, लातूर मनपा हद्दीमधील विवेकानंद ते सिध्देश्वर चौक शासकीय रस्त्यामध्ये, कृपासदन रोड जवळ दक्षिण व उत्तर बाजूनी ६ लोकांनी जब्बरदस्ती ने कच्चे अतिक्रमण केले आहे. म्हणून आजपर्यंत येथे पक्या नाल्या व रोड होऊ शकला नाही. त्यामुळे पावसासह या भागातील नित्य सांडपाण्याचा निचरा होत नाही. म्हणून या दलदल व दुर्गंधीमुळे, येथे सतत आरोग्य व रोगराईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. याशिवाय शहराच्या मूळ गावभागात जाणारा, हा अत्यंत एक महत्वाचा प्रमुख पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे पादचारी व वाहन धारकांची मोठी अडचण झाली आहे. सदर गैर अतिक्रमण हटवावे म्हणून, कांही नागरिक हे गेली २०-२२ वर्षे प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर ते अतिक्रमण २-३ वेळा हटविले गेले होते. मात्र मनपा ही त्याचवेळी तेथे पक्या नाली व रोड करत नसल्याने, ते अतिक्रमित पुन्हा परत रस्त्यावर पूर्ववत येतात. हे अतिक्रमित सुशिक्षित सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी या रस्त्यामध्ये कम्पाऊंड वालसह खाजगी गटारी, संडास टँक, पत्र्यांच्या शेडचे पानमहल बनविले असून, त्याचे ते खुशाल जाहीरपणे भाडेही खातात.


मा. राज्य शासनाच्या चालू अधिवेशन काळात, या अशा मनमानी अन्याविरुद्ध, ” सार्वजनिक सरकारी रस्ता बचाओ नागरी कृती समितीच्या “वतीने जुलै २०२४ पासून, नागरिकांचा रितसर संघर्ष चालू आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी मनप प्रशासनास ७-८ पत्र दिली. मनपाने वारंवार पाहणी करून, हे अतिक्रमण झाल्याचे लेखी मान्य केले. तरी पण स्वतः कांही ते काढत नाहीत. म्हणून शेवटी ६ जानेवारीस नागरिकांनी, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले. तेव्हा २४ जानेवारीस मनपा आयुक्तांनी अवध्या १५ दिवसात हे अतिक्रमण हटविण्याचे, मा. जिल्हाधिकारी यांना व सत्याग्रहीना स्वतंत्र पत्राव्दारे लेखी आश्वासन दिले. त्यावर मा. जिल्हाधिकारी यांनी पण आंदोलनार्थीना एक लेखी पत्र दिले. त्यामुळे १९ व्या दिवशी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान मनपाने सदर रोडचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण केले. मात्र नेमके त्या अतिक्रमणाच्या ठिकाणचे अंदाजे ३० टक्के काम तसेच ठेवले. पाहणी, चर्चा व बैठकांचे सोपस्कारही उरकले. मात्र मनपाने अखेर ते अतिक्रमण काही काढले नाही. आणि तेथे नाल्या व रोडपण केलाच नाही. त्यांनी नेहमीच्याच त्यांच्या टाळाटाळ व अक्षम्य दिरंगाईचा पाढा काही सोडलाच नाही.
त्यांच्या लेखी आश्वासन दीड महिना लोटला. शेवटी त्यांनी मा. जिल्हाधिका-यांच्या लेखी आदेशास व आयुक्तांच्या लेखी आश्वासनास, स्वतःच जाहीर हरताळ फासला. आणि नागरिकांची घोर फसवणूक केली. याचा जाहीर खेद व्यक्त करत, या रस्त्यामधील ते अतिक्रमण त्वरीती हटवून, तेथे उर्वरित पक्क्या नाल्या व रोड करावा म्हणून ७ मार्च रोजी सकाळी ११ वा. पासून, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी, पुन्हा आपले बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले आहे. आणि त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री आदींना सादर केले आहे. रामकुमार रायवाडीकर यांच्या या सत्याग्रहात सक्रिय सहभागी होऊन, सूरज पाटील, वैजनाथ माने, पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, रामदास ससाणे, बाबुराव झाकडे, बुद्धाजी कांबळे, रघुनाथ बेडदे, वलीभाई शेख, गणपतराव तेलंगे, संजय व्यवहारे, श्री श्याम प्रतापराय वरियाणी, पत्रकार बाळ होळीकर, प्रा. दिनकर कांबळे, बाबा शेख, श्री पंडितराव बंडे, अँड. डी एन भालेराव, माजी सरपंच श्री माधवराव गायकवाड, तिरभद्र इंदुलकर, जग्गनाथ सुरवसे, अगंदराव कांबळे, साथी अतिष नवगीरे, शत्रुघ्न कांबळे, सत्यभामा माने, भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय बेले, ऍड. मधुकर कांबळे, कॉ. दिगंबर सुर्यवंशी
आदीनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

